Solapur : मोहोळमध्ये गारपीट; जिल्ह्यात अवकाळी,वीज कोसळून तीन जनावरांचा मृत्यू; पत्रे उडाले, ठिकठिकाणी आंब्यांचे नुकसान

जिल्ह्यात बुधवारी (ता. १०) रात्री व गुरुवारी (ता. ११) सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. देगाव (ता. मोहोळ) व तिऱ्हे (ता. उ. सोलापूर) येथे अवकाळीसह गारपीट झाली.
मोहोळमध्ये गारपीट; जिल्ह्यात अवकाळी
मोहोळमध्ये गारपीट; जिल्ह्यात अवकाळीSakal

Solapur News : जिल्ह्यात बुधवारी (ता. १०) रात्री व गुरुवारी (ता. ११) सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. देगाव (ता. मोहोळ) व तिऱ्हे (ता. उ. सोलापूर) येथे अवकाळीसह गारपीट झाली.

वादळी वाऱ्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. वीज कोसळून अंजनगाव खेलोबा (ता. माढा) येथील दोन गायी तर काटेगाव (ता. बार्शी) येथे बैलाचा मृत्यू झाला.

अंजनगावात वीज पडून दोन गायींचा मृत्यू

माढा/उपळाई बुद्रूक : माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक, उपळाई खुर्द, अंजनगाव खेलोबा या भागात गुरुवारी (ता. ११) संध्याकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, वीज अंगावर पडल्याने अंजनगावातील दोन गायींचा मृत्यू झाला.

उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झालेले असताना, अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वांची चांगलीच धांदल उडाली. अवकाळी पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला. परंतु, या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अंजनगाव खेलोबा येथील सलगर वस्तीवरील गणेश शंकर सलगर या शेतकऱ्याच्या घराजवळ वीज कोसळल्याने दोन गायी दगावल्या असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

देगावमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

नरखेड : नरखेड (ता. मोहोळ) परिसरात बुधवारी (ता. १०) रात्री मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला. तसेच गुरुवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह दमदार गारांचा पाऊस झाला. परिणामी जीवघेण्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू असून. ४३ अंशाच्या पुढे गेला आहे. तापमान वाढल्यामुळे रात्रंदिवस अंगाची लाही-लाही होत आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करताना दिसत आहेत.

परंतु ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे खालून उन्हाने तापलेल्या जमिनीतून तर वरून उन्हाच्या कडाक्याने जीवघेणा उकाडा निर्माण झाला आहे. यातच बुधवारी रात्री बाराच्या सुमारास विजांचा कडकडाट तासभर सुरू होता.

तसेच गुरुवारीही सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस पडला. त्यामुळे हवेत तात्पुरता गारवा निर्माण झाला होता. अवकाळी पावसाने आंबा, कलिंगड, खरबूज, द्राक्ष पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी हनुमंत पवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. अवकाळी पावसाने जीवित हानी झाली नाही. हा अवकाळी पाऊस मसले चौधरी व देगाव परिसरात दमदार झाला.

तिऱ्हे परिसराला गारपिटीने झोडपले

उ. सोलापूर : अवकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावली असून, गुरुवारी सायंकाळी तिऱ्हे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे नदी परिसरातील केळीच्या बागा तसेच उशिरा काढणीस आलेल्या द्राक्षबागास फार मोठा फटका बसला. बुधवारी रात्री ही तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

बुधवारी रात्री तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गुरुवारी दिवसभर वातावरण ढगाळ राहिले. सायंकाळी चारच्या सुमारास तालुक्यात वादळी वाऱ्यास सुरवात झाली. यामध्ये तिऱ्हे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे पत्र्यांच्या घरावरील छत उडून गेले.

त्याचबरोबर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सीना नदीच्या काठी असलेल्या केळीच्या भागाची ही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तालुक्यातील काही ठिकाणी उशिरा काढणीस आलेल्या द्राक्ष बागा आहेत अशा भागांचे या अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचे समोर येत आहेत. सुमारे अर्धा तास या परिसरात पाऊस झाला.

पोथरे परिसरात शेतकऱ्यांची धावपळ

पोथरे : पोथरे (ता. करमाळा) परिसरात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने दुपारी तीन वाजता हलक्या स्वरूपात हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, मका पिकांवर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा काढून शेतात ठेवलेला आहे. कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती.

कैऱ्याही या पावसामुळे काही प्रमाणात गळल्या आहेत. दिवसभर उन्हाने जमीन तापल्यामुळे या हलक्या पावसाचे बाष्पात रूपांतर होऊन दुपारनंतर वातावरणात तीव्र उष्णता निर्माण झाली होती. आकाशात आणखीन ढग दाटून आले असून अधून मधून मेघगर्जना होत असल्याने अवकाळी पाऊस जास्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कांदा, मका उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com