esakal | करमाळा बाजार समिती सचिवपदी क्षीरसागर कायम! बंडगर, बागल गटाला धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

करमाळा बाजार समिती सचिवपदी क्षीरसागर कायम! बंडगर, बागल गटाला धक्का

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिवपद सेवाज्येष्ठतेनुसार विठ्ठल क्षीरसागर यांच्याकडे ठेवण्याचा आदेश पणन संचालक सतीश सोनी यांनी दिला आहे.

करमाळा बाजार समिती सचिवपदी क्षीरसागर! बंडगर, बागल गटाला धक्का

sakal_logo
By
अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Karmala Market Committee) सचिवपद सेवाज्येष्ठतेनुसार विठ्ठल क्षीरसागर (Vitthal Kshirsagar) यांच्याकडे ठेवण्याचा आदेश पणन संचालक सतीश सोनी (Satish Sony) यांनी दिला आहे. सचिव पदाचा पदभार राजेंद्र पाटणे यांना सोपविण्याचा करमाळा बाजार समितीचा ठराव व सभापती शिवाजी बंडगर यांचा आदेश पणन संचालक सतीश सोनी यांनी रद्द केला आहे. हा आदेश निघाल्याचे समजताच सभापती बंडगर (Bandgar Group) व बागल गटाला (Bagal Group) धक्का बसला असून, जगताप गटाच्या (Jagtap Group) समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

हेही वाचा: दमदार पावसामुळे सीना नदीवरील चार बंधारे पाण्याखाली !

बाजार समितीचे सचिवपद हा विषय सत्ताधारी बागल व जगताप गटाने आपापल्या परीने लावून धरल्याने प्रतिष्ठेचा झाला होता. पणन संचालकांच्या निर्णयामुळे बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर व बागल गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. या निर्णयाने माजी आमदार जयवंतराव जगताप यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माजी आमदार जगताप यांनी 29 वर्षे बाजार समितीच्या सभापतीपदाचे कामकाज पाहिले. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत अंतर्गत बंडाळीतून प्रा. बंडगर यांनी बंडखोरी करत सभापतिपद मिळवले होते. तेव्हापासून बाजार समितीवर सातत्याने राजकीय अस्थिरतेचे परिणाम जाणवत आहेत. त्यातच बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्या वेळी शिंदे यांनी सेवाज्येष्ठता व कायद्यातील तरतुदीनुसार सेवाज्येष्ठ कर्मचारी विठ्ठल क्षीरसागर यांच्याकडे सचिवपदाचा पदभार सोपविला व बाजार समितीत नवीन वादाला तोंड फुटले.

हेही वाचा: कोरोनामुळे 28 हजार मुले अनाथ! शासन मदत नाहीच; अनाथ बनले बालमजूर

सभापती बंडगर व बागल गटाला सचिव पदाचा पदभार क्षीरसागर यांच्याऐवजी पाटणे यांच्याकडे सोपवायचा होता. क्षीरसागर यांच्याकडील पदभार मान्य नसल्यामुळे सभापती बंडगर यांनी पणन संचालक यांच्याकडे तक्रार करत सचिव पदभाराबाबत जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत नव्याने संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्याची मागणी केली. त्यानुसार 29 जूनला झालेल्या बैठकीत समसमान मते पडल्यामुळे सभापतींच्या निर्णायक मताच्या आधारे पाटणे यांचा ठराव मंजूर झाला.

क्षीरसागर यांच्या वतीने अ‍ॅड. अभय इनामदार, पाटणे यांच्या वतीने अ‍ॅड. तोष्णीवाल व अ‍ॅड. बलवंत राऊत तर सभापती बंडगर यांच्या वतीने अ‍ॅड. सोमण यांनी काम पाहिले. हे वृत्त समजताच जगताप गटाच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

loading image
go to top