सोलापूर : मानाच्या पालख्या रेल्वे रुळावरून जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Warkari tradition 10 palakhi railway tracks Sargam Chowk meeting wth officials solapur

सोलापूर : मानाच्या पालख्या रेल्वे रुळावरून जाणार

सोलापूर : वारकरी प्रथा, परंपरेनुसार १० मानाच्या पालख्या सरगम चौकातील रेल्वे रुळावरूनच जाणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, रेल्वेचे अधिकारी, विभागीय विद्युत अभियंता पराग आकनूरवार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे, विभागीय ऑपरेशन व्यवस्थापक एल. के. रानयेवले आणि पालखी संस्थानचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चेतून तोडगा निघाला आहे.

पंढरपूरला वारी करण्याची खूप वर्षांची प्रथा आहे. यानुसार वारीला मानाच्या सात पालख्या येतात, यात आणखी तीनची भर पडली आहे. मानाच्या १० पालख्यांची उंची १२ फुटांपेक्षा जास्त आहे. यामुळे सरगम चौकातील रेल्वे पुलाच्या खालून जाता येत नसल्याने रेल्वे रुळावरून पालख्या जात होत्या. ही परंपरा खूप वर्षांची आहे. मात्र, रेल्वेने यंदा रेल्वेचे विद्युतीकरण केल्याने ५.८० मीटर उंचीवरून हाय व्होल्टेज वायर जात असल्याने यामुळे काही धोका निर्माण होऊ नये, यासाठी यावर तोडगा काढण्यासाठी नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की, कोरोनाचे निर्बंध हटविल्याने वारीचा उत्साह मोठा आहे. यामुळे यंदा १५ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. वारकरी संप्रदाय, प्रथा-परंपरा यांना महत्त्व आहे. मानाच्या पालख्यांचा मार्ग बदलणे योग्य ठरणार नाही. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारकरी परंपरेचा मान राखून पर्याय सुचवावेत. वारकरी संस्थानांना विनंती की त्यांनी आपापले रथ, पालखी कमीत कमी वेळेत रेल्वे रूळ पार करावा. रथ किंवा पालखी वरून गेली तर इतर वारकऱ्यांनी पुलाच्या खालून जावे. मानाच्या पालख्या सोडून इतर पालख्या रेल्वे रुळाखालून किंवा इतर मार्गाने नेण्यात याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

विभागीय विद्युत अभियंता श्री. आकनूरवार यांनी सांगितले की, रेल्वेची भूमिका प्रथा-परंपरेनुसार सामंजस्याची राहील. कुर्डुवाडी ते सांगोला विद्युतपुरवठा स्थगित करावा लागेल किंवा पालख्या जाईपर्यंत विद्युत तार हटवावी लागेल. दुसरा पर्याय वारी कालावधीत रेल्वे विद्युत इंजिनऐवजी डिझेल इंजिनचा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, संत सोपानदेव पालखी संस्थानचे मनोज रणवरे, संत मुक्ताबाई संस्थानचे शशिकांत पाटील, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे पुरुषोत्तम उत्पात, सोपानदेव समाधी संस्थानचे सिद्धेश शिंदे, चांगावटेश्वर संस्थानचे अरुण दरेकर, शशिकांत जगताप आदी उपस्थित होते.

जादा गर्दीचा अंदाज धरून बंदोबस्त

दोन वर्षांनंतर यंदा आषाढीचा सोहळा होत आहे. यामुळे यंदाच्या वारीत नेहमीपेक्षा जास्त वारकरी जमतील असा अंदाज गृहीत धरून प्रशासनाने तयारी केली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी मोठा बंदोबस्त असून जादा कुमक मागवली आहे. यंदाच्या वारीसाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. सहा हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त असेल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

Web Title: Warkari Tradition 10 Palakhi Railway Tracks Sargam Chowk Meeting Wth Officials Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top