ही कोणती पद्धत, दीड किलोमीटरमध्ये ११ गतिरोधक! सोलापूर-बार्शी रस्त्यावरील बाळे टोल नाक्याजवळ ना दुरुस्ती ना देखभाल, टोलवसुली सुरु

सोलापूर-बार्शी रस्त्यावरील बाळे टोल नाक्यापर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, रस्त्याची कोणतीही देखभाल दुरुस्ती केली जात नाही. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून टोल वसुली सुरू आहे. अवघ्या दीड किलोमीटरमध्ये ११ ठिकाणी गतिरोधक आहेत.
Speed Breaker
Speed Breakeresakal

सोलापूर : सोलापूर-बार्शी रस्त्यावरील बाळे टोल नाक्यापर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, या रस्त्याची कोणतीही देखभाल दुरुस्ती केली जात नाही. मात्र, या रस्त्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून टोल वसुली सुरू आहे. अवघ्या दीड किलोमीटरमध्ये तब्बल ११ ठिकाणी गतिरोधक आहेत.

बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर-बार्शी या मार्गाचे डांबरीकरण झाले आहे. मात्र, हे डांबरीकरण टोल नाक्यापर्यंतच झालेले आहे. टोल नाका ते बाळे पूल या दरम्यानचा रस्ता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. वीस वर्षांपूर्वी झालेल्या रस्तेबांधणीसाठी अजूनही टोल वसुली सुरू आहे. मात्र, या टोल वसुलीतून या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती होणे आवश्यक असताना, या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही.

गतिरोधक ठरताहेत यमदूत

गतिरोधक कसे असावेत, कुठे असावेत, किती अंतरावर असावेत, या संदर्भात नियमावली असतानाही या मार्गावर कोणत्याही प्रकारचे सूचना फलक न लावता, अवघ्या शंभर पन्नास फुटाच्या अंतरावर गतिरोधक करण्यात आले आहेत. अवघ्या दीड किलोमीटर मार्गावर येथे ११ गतिरोधक आहेत. विशेष म्हणजे एकाही गतिरोधकाबाबतच सूचना फलक नाही अथवा गतिरोधकास रंग लावलेला नाही. यामुळे हे गतिरोधक वाहनचालकांसाठी यमदूत ठरत आहेत.

पदपथ झाला गायब

या मार्गाच्या दोन्ही बाजूला पदपथ तयार करण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी पदपथावरच दुकाने थाटली आहेत तर काही ठिकाणी वाहने उभी केली आहेत. या पदपथावरील झाडे मोठी झाल्याने पदपथ पूर्णपणे उखडला गेला आहे. पदपथावर कुठेही फरशी किंवा पेव्हर ब्लॉग बसविण्यात आलेले नाहीत. सर्व ठिकाणचे पदपथ गायब झाले आहेत.

टोल वसुली किती वर्षे

मागील पंधरा ते वीस वर्षांपासून सुरू असलेली टोल वसुली अद्याप सुरूच आहे. ही टोल वसुली किती वर्ष केली जाणार तसेच टोल वसुलीतून रस्त्याच्या दुरुस्तीवर किती खर्च केला जातो, याबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता तसेच टोल विभाग यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

रस्ता दुभाजकात वाढली झुडपे

या मार्गावरील रस्ता दुभाजकात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढलेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्ता दुभाजक तुटलेले किंवा मुद्दाम फोडण्यात आलेले आहेत. यामुळे अचानक कुठेही रस्ता क्रॉसकरण्यासाठी पादचारी येऊ शकतात. दुचाकीस्वारही या तुटलेल्या रस्तादुभाजकांमधून वाहने घालतात यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com