स्वबळावर लढल्यास सत्ता कोणाची? तिन्ही पक्षांच्या नेत्यांना ‘महाविकास’चीच आशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahavikas aaghadi
स्वबळावर लढल्यास सत्ता कोणाची? तिन्ही पक्षांच्या नेत्यांना ‘महाविकास’चीच आशा

स्वबळावर लढल्यास सत्ता कोणाची? तिन्ही पक्षांच्या नेत्यांना ‘महाविकास’चीच आशा

सोलापूर : राज्याच्या राजकारणात सत्ताकलह सुरू असून, पक्षाशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले आहेत. आता महाविकास आघाडीचे सरकार राहील की नाही, असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे. त्यामुळे आघाडीतील तिन्ही पक्षांनी आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. पण, निवडणूक स्वबळावर लढल्यास महापालिका व जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची, याचा तर्कवितर्क लढविला जात आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वच जागांवर (प्रभाग) उमेदवार उभा करता आलेले नाहीत. युती आणि आघाडीमुळे शिवसेना व राष्ट्रवादीवर तशी वेळ आली नाही. पण, आतापर्यंत काहीवेळा काँग्रेस आणि भाजपने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाल्यास सर्वच पक्षांना स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. भविष्याचा वेध घेऊन तिन्ही पक्षांनी आता स्वबळाची तयारी सुरू केली आहे. आघाडी होऊ द्या अथवा नाही, तरीदेखील महापालिकेवर आमचीच सत्ता असेल, असा विश्वास काँग्रेसचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. तर आतापेक्षा अधिक उमेदवार विजयी होतील, असा दावा शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहेत. राष्ट्रवादीला मात्र महाविकास आघाडीची गरज वाटत आहे. दुसरीकडे भाजपने, आम्ही विकासकामांच्या बळावर पुन्हा एकदा सत्तेवर येऊ, असा दावा केला आहे.

हेही वाचा: लाच घेणे थांबणार! पोलिस ठाण्यांमधील सीसीटीव्हीत आता ‘ऑडिओ’ रेकॉर्डिंग

स्वबळावर लढल्यावरही सत्ता आमचीच

महाविकास आघाडी आता राहील की नाही हे देव जाणे. पण, आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची वेळ आल्यास भाजपला पराभूत करून काँग्रेसचाच महापौर होईल. महाविकास आघाडी कायम राहिल्यास तिन्ही पक्षांत काँग्रेस हाच सर्वांत मोठा पक्ष असेल. तरीही, आम्ही स्वबळाची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

महाविकास आघाडीच भाजपला पराभूत करेल

राज्याच्या राजकारणात शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. पण, त्यातून काही सिद्ध होणार नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप स्वतंत्र गट स्थापन करण्यासंबंधी पत्र दिलेले नाही. पक्षाच्या बैठकीला आमदार हजर राहिले नाहीत म्हणून ते निलंबित होत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कायम राहील, असा विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आगामी महापालिका निवडणूक लढल्यास भाजप सहजपणे पराभूत होऊ शकतो, असा विश्वास माजी महापौर महेश कोठे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: शेतकऱ्यांना ठाकरे सरकारचा दिलासा! जुलैअखेर मिळणार ५० हजारांचे अनुदान

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आघाडी हवीच

राज्यातील महाविकास आघाडी सरकार किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेची महाविकास आघाडी कायम राहावी, असा पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्षांची आघाडी आवश्यक आहे. तरीपण, महाविकास आघाडी न झाल्यास शिवसेना स्वबळावर लढेल आणि सध्याच्या नगरसवेकांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी व्यक्त केला.

महापालिकेवर भाजपचीच पुन्हा सत्ता येईल

एकमेकांच्या विरोधातील तीन पक्ष एकत्रित येऊन सरकार स्थापन केलेल्या महाविकास आघाडीची सध्या अवस्था काय झाली, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे जनता सत्तेच्या मागे लागलेल्यांना नव्हे तर विकासाला मत देईल. भाजपची रिपाइंसोबत युती कायम आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल. ११३ पैकी ७० हून अधिक नगरसेवक भाजपचे निवडून येतील, असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी व्यक्त केला.

Web Title: Whose Power If We Fight On Our Own Leaders Of All Three Parties Hope For

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..