Solapur | 'विलिनीकरण होईपर्यंत कामावर जाणार नाही'; एसटी कर्मचाऱ्यांची शपथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

St Employee Oath

'विलिनीकरण होईपर्यंत कामावर जाणार नाही'; एसटी कर्मचाऱ्यांची शपथ

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर - एसटी कर्मचाऱ्यांना राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला असला, तरी सोलापूरमधील एसटी कर्मचाऱ्यांनी या निर्णयाला विरोध करीत गुरुवारी ता. 25 रोजी संपावर ठाम असल्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्राच्या निर्णयावर कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत वेतनवाढ केवळ गाजर दाखविण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. याच्या निषेधार्थ गुरुवारी ता. 25 रोजी सकाळी 12 वाजण्याच्या दरम्यान विभागीय कार्यशाळेसमोर एसटीचे जोपर्यंत राज्य शासनात विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत कामावर जाणार नाही अशी सामुदायिक शपथ घेतली.

सोलापूर विभागातील नऊ आगरामधील एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर ठाम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच सोलापूर आगारात या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागील 23 दिवसांपासून राज्यभर कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तर याच मागणीसाठी राज्यभरातून आझाद मैदानावरही कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. दुसरीकडे न्यायालयीन पातळीवर देखील लढा सुरू असताना या संपावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी झालेल्या बैठकीनंतर वेतनवाढ देण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी जाहीर केला. मात्र, या निर्णयास सोलापूरमधील एसटी कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध करीत जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होणार नाही, तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही असा ठाम निर्णय यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: शिवसेनेच्या संपर्कप्रमुखाविरुद्ध चार जिल्हाप्रमुखांनी ठोकला शड्डू

जोपर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत 42 आत्महत्या केलेल्या शहीदांसाठी दुखवटा पाळणार आहे. परिवहन मंत्र्यांनी केलेली वेतन वाढ आम्हांला मान्य नाही. त्यामुळे कोणीही कामावर जाणार नाही, ही शपथ घेण्यात आली. त्यामुळे सोलापूर विभागातील एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याचे जाहीर करण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्यांचा लढा विलीनीकरणासाठी आहे. राज्य शासनात एसटीचे विलीनीकरण झाल्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शासनाने केलेली वेतन वाढ आम्हाला मान्य नाही. कारण आमची प्रमुख मागणी विलीनीकरणाची आहे.

- बलभीम पारखे, एसटी कर्मचारी

विलिनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही वेतनवाढ ही केवळ कर्मचाऱ्यांना नादी लावण्यात करण्यात आली आहे.

- विजय यादव, एसटी कर्मचारी

loading image
go to top