बसस्थानकातील विक्रेत्यांची आठ दिवसांपासून उपासमार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bus stand

गेल्या आठ दिवसात आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे प्रवासी बसस्थानकाकडे फिरकत नाहीत.

बसस्थानकातील विक्रेत्यांची आठ दिवसांपासून उपासमार!

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांनी मागील आठ दिवसांपासून राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदचा सर्व स्तरावर परिणाम होत आहे. मागील आठ दिवसांपासून सोलापूर विभागातील 9 आगारातून एकही बस आगाराबाहेर न पडल्यामुळे बसस्थानकात व्यवसाय करणारे तसेच बसस्थानकात गोळ्या बिस्किट विकणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

एसटी कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी रविवार (ता. 07) नोव्हेंबरपासून संपावर गेले आहेत. जिल्ह्यातील नऊ आगारातील मिळून चार हजार 200 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. गेल्या आठ दिवसात आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे प्रवासी बसस्थानकाकडे फिरकत नाहीत. बस स्थानकात आठ दिवसापासून शुकशुकाट असल्याने बुक स्टॉल, उपहारगृह, चहा कॅन्टीन, पान टपऱ्या आदी दुकाने बंद आहेत. मागील आठ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसस्थानकातील व्यवसाय ठप्प असले तरी बसस्थानकात व्यवसाय करण्यासाठी घेतलेल्या आस्थापना, टपऱ्याच्या भाड्याची आकारणी मात्र नियमितपणे बसस्थानक व्यवस्थापनाकडून सुरू असल्याचे यावेळी विक्रेत्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: सोलापूर : कंपोस्ट खताच्या उकिरड्यापासून गरम पाणी

यापूर्वी कोरोना काळात लॉकडाउन लागू केल्यानंतर आणि एसटीचे प्रवासी वाहतूक बंद केल्यानंतरही बसस्थानकातील व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले होते. व्यवसाय बंद असताना भाडे मात्र आकारले जात होते. कोरोना काळात लॉक डाउन केल्याने व्यवसाय बंद असल्याने भाडे देऊ शकले नाहीत. त्यामुळे कोरोना काळातील भाडे देखील देता आले नसल्याचे यावेळी विक्रेत्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प

प्रवाशांना विविध ठिकाणी पोचविण्यासाठी बस स्थानक परिसरात ठिय्या मांडणाऱ्या रिक्षाचालकांचा व्यवसायही ठप्प झाला आहे. मागील आठ दिवसांपासून बसस्थानकातून बस सुटल्या नसल्यामुळे रिक्षा चालक आता शहरात फिरून व्यवसाय करीत असल्याचे बसस्थानक परिसरातील रिक्षाचालकांनी सांगितले.

हेही वाचा: सोलापूर : मोठ्या आवाजात हेडफोन वापरणे धोकादायक

मागील आठ दिवसांपासून एसटी बंदमुळे रिक्षा व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बस बंद असल्याने बसस्थानक परिसरात व्यवसाय नसल्याने आता शहरात फिरुन व्यवसाय करावा लागत आहे. व्यवसाय नसल्याने कुटुंब चालविणे कठीण बनले आहे.

- महेश बनसोडे, रिक्षा चालक

पूर्वी लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद पडला होतो. त्यामुळे आता कुठे तरी सर्व काही पूर्वपदावर येत असताना एसटी कर्मचा-यांनी केलेल्या संपामुळे एसटी बंद असल्याने रिक्षा व्यवसाय नसल्याने आर्थिक संकट ओढावले आहे.

- सचिन गवळी, रिक्षा चालक

बसमध्ये फळे विकून कुटूंबाचे पोट भरत असताना व्यवसाय मागील आठ दिवसांपासून बंद असून, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

- प्रदीप काळे, फळविक्रेता

loading image
go to top