
शस्त्रक्रियेवेळी संबंधित डॉक्टरांकडून चूक झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यानंतरच सारिका यांची प्रकृती बिघडत गेली.
Solapur : शस्त्रक्रियेवेळी डॉक्टरांचा हलगर्जीपणा, महिलेला गमवावा लागला जीव; संतप्त नातेवाइकांनी..
सोलापूर : डॉक्टरांचा (Doctor) हलगर्जीपणा आणि शस्त्रक्रियेवेळी केलेल्या चुकांमुळे महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी संतप्त झालेल्या नातेवाइकांनी सोलापुरातील (Solapur) नामांकित रुग्णालयातील डॉक्टरांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.
सारिका दशरथ कसबे (वय ४०, रा. मुकुंद नगर, भवानी पेठ, सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवार ६ जून रोजी सकाळी १० वाजता सारिका यांना त्यांचे पती दशरथ यांनी उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात केलेल्या तपासणीनंतर पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले.
यानंतर सारिका यांच्यावर रुग्णालयातील (Hospital) डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेवेळी संबंधित डॉक्टरांकडून चूक झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यानंतरच सारिका यांची प्रकृती बिघडत गेली. त्यातच गुरुवारी पहाटे पाच वाजता सारिका यांचा मृत्यू झाला. केवळ डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि चुकीमुळे सारिका यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त झालेल्या नातेवाइकांनी केला.
या घटनेनंतर सारिका कसबे यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस तैनात करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातही पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तीन डॉक्टरांच्या निगराणीखाली शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा राखून ठेवला आहे. अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून वैद्यकीय समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.