esakal | Women's day 2021 : राष्ट्रीय स्तरावर पटकावली पदके, आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा लक्ष्य ! सोलापूरच्या डायव्हिंगपटू ईशाची यशस्वी घोडदौड 

बोलून बातमी शोधा

Eisha

अशोक चौक येथील ईशा वाघमोडे हिने डायव्हिंग (जलतरण) या क्रीडा प्रकारात परिश्रम व चिकाटीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर स्वतःचा ठसा उमटवला आहे. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न तिने बाळगले आहे. 

Women's day 2021 : राष्ट्रीय स्तरावर पटकावली पदके, आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा लक्ष्य ! सोलापूरच्या डायव्हिंगपटू ईशाची यशस्वी घोडदौड 
sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर : अशोक चौक येथील ईशा वाघमोडे हिने डायव्हिंग (जलतरण) या क्रीडा प्रकारात परिश्रम व चिकाटीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर स्वतःचा ठसा उमटवला आहे. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न तिने बाळगले आहे. 

ईशा वाघमोडेच्या घरी एक दिवस तिच्या वडिलांचे मित्र घरी आले. तेव्हा त्यांनी डायव्हिंग प्रकारात प्राविण्य मिळवता येईल, असे सुचवले. तिने तत्काळ सरावाला सुरवात केली. 
तिचे प्रशिक्षक मनीष भावसार यांनी तिला नियमित सरावासाठी मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. तीन वर्षांच्या सरावामध्ये स्प्रिंग बोर्ड व हायबोर्ड प्रकारामध्ये ती अगदी तरबेज झाली. शालेय, विभागीय आणि राज्य स्पर्धांमध्ये ती मोठी कामगिरी करू लागली. मुंबई येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय स्पर्धेत एक सुवर्ण व दोन रजत पदके पटकावली. 

या कामगिरीच्या आधारावर तिने 2016 पासून अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. तिला पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेची संधी मिळाली. बंगळूरमध्ये तिने सबज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये स्प्रिंग बोर्ड प्रकारात सुवर्णपदक मिळवले. तिच्या या कामगिरीची दखल घेत तिला कोलंबोतील साऊथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत संधी मिळाली. या स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदके मिळवली. याच वर्षी तिला नॅशनल स्कूल गेम स्पर्धेत हाय बोर्ड प्रकारात रजत पदक मिळाले. 

2017 मध्ये तिने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर मोठी कामगिरी बजावली. पुण्यात झालेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत स्प्रिंगबोर्ड प्रकारात कांस्यपदक मिळवले. दिल्लीमध्ये नॅशनल स्कूल गेममध्ये ब्रॉंझ पदक मिळवले. 

2018 मध्ये 45 व्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा पुणे येथे झाल्या. त्यात तिला सुवर्णपदक मिळाले. केरळमध्ये झालेल्या 72 सिनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तिने सहभाग नोंदवला. दिल्ली येथे नॅशनल स्कूल गेम्समध्ये तिने एक रौप्य व एक कांस्यपदक पदक मिळवले. स्प्रिंग बोर्ड या जलतरण प्रकारामध्ये तिने मिळवलेले वर्चस्व अत्यंत महत्त्वाचे होते. 

2019 मध्ये राजकोट येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तिला एक सुवर्ण व एक कांस्यपदक मिळाले. दिल्ली येथे झालेल्या 65 व्या नॅशनल स्कूल गेममध्येही तिने पुन्हा एकदा सुवर्णपदक मिळवले. 

ही कामगिरी करत असताना तिला अनेक संकटांनाही तोंड द्यावे लागले. कधी आर्थिक अडचणीमुळे तिला स्पर्धामध्ये सहभाग घेता आला नाही, तर प्रशिक्षक मनीष भावसार यांनी तिला मदत करत खऱ्या अर्थाने पुन्हा संधी दिली. ईशाचा हा प्रवास वेगाने सुरू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठी कामगिरी करण्याचे तिचे स्वप्न आहे. यावर्षी प्रजासत्ताकदिनी सर्वोत्कृष्ट महिला जिल्हा क्रीडा पुरस्कार तिला मिळाला आहे. 

ईशाची कामगिरी 

  • 2016 : कोलंबो (श्रीलंका) येथे साऊथ एशियन ऍक्‍वेटिक चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदके 
  • 2016 : बंगळूर सबज्युनिअर नॅशनॅल ऍक्‍वेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक 
  • 2017 : पुणे येथे ज्युनिअर ऍक्‍वेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक 
  • 2018 : पुणे येथील 45 वी ज्युनिअर नॅशनल ऍक्‍वेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक 
  • 2019 : राजकोट येथील 46 ज्युनिअर नॅशनल ऍक्‍वेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक 

आम्हाला तर तिला घडलेले पाहायचे आहे. तिने स्वतः हे काम करत स्वतःला घडवले आहे. आजही ती मोकळेपणाने तिचे अनुभव मला सांगते. त्यातील काय चांगले आहे व ते स्वीकारण्याची तयारी करून देण्याचे काम आई म्हणून मी करते. 
- मंजुश्री वाघमोडे, 
ईशाची आई 

संपादन : श्रीनिवास दुध्याल