
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण जिल्हास्तरीय बदल्यांची प्रक्रिया चालू आहे. या बदल्या प्रशासकीय, विनंती व समुपदेशनाद्वारे होणार आहेत. एकाच पंचायत समिती क्षेत्रात सलग 10 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची इतर तालुक्यात प्रशासकीय बदली होते, तर एकाच जागी सलग तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे कर्मचारी इतरत्र विनंतीने बदली मागण्यास पात्र असतात. या बदल्या नियमानुसार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
15 मे 2014 च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण बदली प्रक्रियेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. 31 मे अखेरीस कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सध्याच्या ठिकाणच्या वास्तव्य सेवाज्येष्ठतेनुसार बदल्या होतात. कार्यरत पदांच्या कमाल 10 टक्के या प्रमाणात प्राधान्यक्रमाने बदल्या केल्या जातात. दरवर्षी 31 मे अखेर बदल्या होत असत. परंतु, कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर चालू वर्षी शासनाने 10 ऑगस्टपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्यास मुदतवाढ दिली आहे.
गंभीर आजार, अपंग, गतिमंद मुलांचे पालक, आजी/माजी सैनिक, विधवा, कुमारिका, घटस्फोटिता, परित्यक्ता अशा कर्मचाऱ्यांना विनंती बदलीत प्राधान्य मिळते. वयाची 53 वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी तसेच पती-पत्नी एकत्रिकरणासाठी बदली मागणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही बदली धोरणात प्राधान्याने विचार केला आहे. बदल्यांमधील अर्थपूर्ण व्यवहार तसेच वशिल्याने होणारे गैरप्रकार बंद व्हावेत आणि सामान्य कर्मचाऱ्यास उचित न्याय मिळावा, अशीच शासनाची भूमिका आहे. बदल्यांमधील विविध प्रकारच्या अनियमितता व गोंधळ यासाठी शिक्षण विभाग हा नेहमीच चर्चेत असतो. निदान या वर्षी तरी बदली प्रक्रिया तंतोतंत शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पडावी, अशीच सर्व बदलीपात्र कर्मचाऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याकडून अपेक्षा आहे.
मंगळवारी झाल्या 43 जणांच्या बदल्या
जिल्हा परिषदेतील अर्थ विभागातील चार, कृषीतील दोन, ग्रामपंचायत विभागातील 14, महिला व बालकल्याण विभागातील 10, पशुंसंवर्धन विभागातील 13 अशा एकूण 43 जणांच्या बदल्यांची प्रक्रिया मंगळवारी झाली. त्यामध्ये चार प्रशासकीय, 38 विनंती तर एक बदली आपसी पद्धतीने झाली. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ सहायक, अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांच्या बदल्या आज झाल्या.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.