सोशल मीडियावर "सोलापुरी फूड'ची दरवळ! 

परशुराम कोकणे 
सोमवार, 24 डिसेंबर 2018

सोलापूर : आबे.. आपल्या सोलापुरात चांगलं खायलाच मिळत नाही.. असं म्हणणाऱ्यांना "सोलापुरी फूड'ने उत्तर दिले आहे. सोलापूरच्या तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केलेल्या "सोलापुरी फूड'ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत लाखो सोलापूरकरांपर्यंत वेगवेगळ्या भागातील खाण्याचे पदार्थ पोचविले आहेत. 

सोलापूर : आबे.. आपल्या सोलापुरात चांगलं खायलाच मिळत नाही.. असं म्हणणाऱ्यांना "सोलापुरी फूड'ने उत्तर दिले आहे. सोलापूरच्या तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केलेल्या "सोलापुरी फूड'ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत लाखो सोलापूरकरांपर्यंत वेगवेगळ्या भागातील खाण्याचे पदार्थ पोचविले आहेत. 

सोलापूर म्हणजे एक "निवांत' जिल्हा.. सोलापूरचे अनेकजण शिक्षण आणि नोकरीसाठी विकसित शहरांकडे म्हणजेच मुंबई, पुण्याकडे स्थलांतरित होत असल्याचे दिसते. कारण, तेथील सुविधा आणि जीवनशैलीमुळे तरुण विकसित शहरांकडे आकर्षित होत आहेत. यात एक म्हणजे हॉटेलिंग आणि फूडी ट्रेंड. तिकडे मिळणाऱ्या नानाविध प्रकारच्या डिशेस. परंतु, आपल्या सोलापुरातही मन तृप्त करणारे अनेक खाद्यपदार्थ मिळतात. कोणते खाद्यपदार्थ, किती रुपयांना आणि कोठे मिळतात हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी बीई मेकॅनिकलचे शिक्षण घेतलेल्या तपन मंगलपल्ली आणि त्याचे मित्र किरणकुमार गजभार, ऋषिकेश कोनापुरे, कवीराज कलशेट्टी, श्‍वेता वेर्णेकर, दीपक दुधगंडी, समर्थ जाधव, प्रतीक पुकाळे यांनी एकत्र येऊन सोलापुरी फूड नावचे ब्लॉग पेज चालू केले. 

याविषयी सांगताना तपन म्हणाला, "माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये अनेकजण फुडी आहेत. सारखं बाहेर जेवायला जाणे, पार्टीला जाणे यामुळे जवळपास सोलापुरातील सर्व हॉटेल्स, ढाबे, चौपाटी, उडपी आणि स्ट्रीट फूड यांची माहिती आम्हाला आहे. यातून सोलापुरातील हॉटेल्सचे मार्केटिंग होऊन सोलापूरकरांना माहिती मिळावी यासाठी आम्ही "सोलापुरी फुड' नावाचे पेज सुरू केले. सोलापुरात मिळणाऱ्या वेगवेगळ्या डिशचे फोटो, त्याची किंमत, पत्ता आणि रेटिंग आम्ही शेअर करतो.' 

काही फॉलोवर्सही आम्हाला खाद्यपदार्थांची लिस्ट पाठवतात. आम्ही त्याची खात्री करून फेसबुक, इन्स्टाग्रामवर पोस्ट करतो. आम्ही आता यूट्युबवरही सुरवात केली आहे. व्हिडीओ स्वरूपात डिशेज पाहता येतील. सोलापूर असंच स्मार्ट बनणार नाही, आपल्याला स्मार्ट बनावं लागेल. तोच प्रयत्न आम्ही करतोय. सोलापुरात खाण्यास चांगले मिळत नाही असा अनेकांचा भ्रम आहे. जे मोठ्या शहरांत मिळते ते सोलापुरातही मिळते. सोलापूरची ओळख सांगणारे अनेक खाद्यपदार्थ प्रसिद्ध होत आहेत, असे तपन याने सांगितले. 

सोलापूर कशात मागे नाही, फक्त मार्केटिंगची कमतरता आहे. त्यामुळे "सोलापुरी फूड'साठी आम्ही इंटरनेटचा वापर करत आहोत. यापुढे पार्टीला कुठे जायचं? असा प्रश्‍न असेल तर सोलापूरकरांनी "सोलापुरी फूड'ला नक्की भेट द्यावी. काही दिवसांत आम्ही सोलापुरी फूडचे मोबाइल ऍप लॉंच करणार आहोत. ऍपच्या माध्यमातून सोलापूरकर हवी ती माहिती मिळवू शकतील. 
- तपन मंगलपल्ली, सोलापुरी फूड

Web Title: solapuri food popular on social media