धक्कादायक ! पैशासाठी मुलाने केला आईचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

मृत मंजुळा जाधव अनेक वर्षांपासून दुधाळवस्तीवर रहात आहेत. श्रीकांत हा जतमध्ये खासगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करतो. दररोज तो मद्यधुंद अवस्थेत घरी यायचा व दारूसाठी पैसे देण्याच्या कारणावरून आईसोबत भांडण करायचा.

जत  ( सांगली ) - शहरातील दुधाळवस्ती येथे स्वतःच्या पोटच्या मुलाने आईने पैसे देण्यास नकार दिल्याने दारूच्या नशेत धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मंजुळा राजाराम जाधव (वय 45) असे मृत मातेचे नाव असून, गुरुवारी (ता. 5) रात्री साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेची नोंद जत पोलिसांत झाली आहे. 

मंजुळा यांची मुलगी स्वाती दयानंद गायकवाड (रा. दुधाळवस्ती, जत) यांनी या घटनेची फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित आरोपी श्रीकांत राजाराम जाधव याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तो फरार झाला होता. जत पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस कार्यालयाचे संयुक्त पथकाने त्याला कोल्हापूर येथून त्याला ताब्यात घेतले आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याला जत पोलिसात आणण्यात आले होते. 

हेही वाचा - कशामुऴे हे गाव पडले ओस...

पैसे देण्याच्या कारणावरून आईसोबत भांडण

याबाबत अधिक माहिती अशी, मृत मंजुळा जाधव अनेक वर्षांपासून दुधाळवस्तीवर रहात आहेत. श्रीकांत हा जतमध्ये खासगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करतो. दररोज तो मद्यधुंद अवस्थेत घरी यायचा व दारूसाठी पैसे देण्याच्या कारणावरून आईसोबत भांडण करायचा. हा प्रकार दररोज चालायचा. गुरुवारीही (ता. 5) तो अशाच मद्यधुंद अवस्थेत घरी आला. घरी आई मंजुळा व चार वर्षांचा नातू (नाव नाही) होते. त्यावेळी पुन्हा त्याने आई मंजुळा यांच्याकडे तीस हजारांच्या रकमेची मागणी केली. यावर आईने त्याला माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. यावरून रात्री उशिरा दोघांमध्ये वाद सुरू झाला. चार वर्षांचा नातू हा सर्व प्रकार पहात होता. या भांडणाच्या भीतीने तो शेजाऱ्यांना बोलवण्यासाठी घराबाहेर गेला. तेवढ्यात घराबाहेर मंजुळा जाधव या आल्या असता, श्रीकांत याने आपल्या जवळील धारदार शस्त्राने छातीवर व पोटात गंभीर वार केल्याने मंजुळा या जाग्यावर कोसळल्या. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

हेही वाचा - डाॅ. आंबेडकर यांचे मुळ आडनाव माहीत आहे का ? जाणून घेण्यासाठी वाचा

आरोपीला कोल्हापुरात अटक

या घटनेनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. आरोपी श्रीकांत हा तेथून पसार झाला. जत पोलिस तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यानंतर जत पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस कार्यालयाचे संयुक्त पथक तयार करून आरोपीला शोधण्यासाठी पाठवले होते. शुक्रवारी कोल्हापूर येथून त्याला अटक करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मोहिते करत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son Kills Mother For Money Incidence In Jat