अध्यक्षपदासाठी पुत्रप्रेम उफाळले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी खुले आहे. या पदावर डोळा ठेवून जिल्ह्यातील सर्वच पक्षांतील नेत्यांचे पुत्रप्रेम उफाळून आले आहे. कट्टर, प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांनी स्वतःचा मुलगा, भाऊ यांना रिंगणात उतरवले आहे. आपल्या पक्षाची सत्ता आली तर मुलगाच अध्यक्ष झाला पाहिजे, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. 

कोल्हापूर - जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी खुले आहे. या पदावर डोळा ठेवून जिल्ह्यातील सर्वच पक्षांतील नेत्यांचे पुत्रप्रेम उफाळून आले आहे. कट्टर, प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांनी स्वतःचा मुलगा, भाऊ यांना रिंगणात उतरवले आहे. आपल्या पक्षाची सत्ता आली तर मुलगाच अध्यक्ष झाला पाहिजे, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. 

जिल्हा परिषदेसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे. काल (ता. ६) अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. पाच-सहा दिवसांतील घडामोडी पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप आघाडीनेही बहुतांश ठिकाणी कार्यकर्त्यांना डावलून आपल्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. ज्या वारसदारांनी पक्षाचा फॉर्म भरून उमेदवारी मागितलेली नाही, मुलाखतही दिलेली नाही, असे आज पक्षाचे उमेदवार ठरले आहेत. काही ठिकाणी प्रबळ उमेदवाराला डावलले आहे. सर्वच तालुक्‍यांत हे वारसदार निवडून यावेत यासाठी त्या त्या पक्षातील नेत्यांनी खबरदारी घेताना अशांच्या विरोधात आपला उमेदवारही दुबळा दिल्याचे दिसत आहे. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल परितेतून, माजी आमदार यशवंत एकनाथ यांचे पुत्र अमर सातवेतून, मानसिंगराव गायकवाड यांचे पुत्र रणवीर शित्तूर तर्फ वारुण गटातून, ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके यांचे पुत्र संदीप कळेतून, दुसरे संचालक पी. डी. धुंदरे यांचे पुत्र सागर हे राशिवडेतून, काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी तर पक्ष वाऱ्यावर सोडून स्थानिक आघाडी करताना रेंदाळ गटातून मुलगा राहुल याला रिंगणात उतरवले आहे. माजी आमदार (कै.) नरसिंगराव पाटील यांचे पुत्र महेश हे काँग्रेसच्या तिकिटावर माणगावमधून रिंगणात आहेत.  

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र याला बोरवडेतून उमेदवारी देताना मंडलिक गटाचे शिलेदार समजले जाणारे भूषण पाटील यांना डावलले. शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र अंबरिश सिद्धनेर्लीतून, आमदार चंद्रदीप नरके यांचे भाऊ अजित कोतोलीतून, राष्ट्रवादीच्या चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह हे नेसरी गटातून, तर विठ्‌ठलराव नाईक- निंबाळकर यांचा मुलगा राजवर्धन नांदणी गटातून निवडणूक लढवत आहेत. तसेच शेकापचे माजी आमदार (कै.) गोविंद कलिकते यांचे पुत्र संजय हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर कौलवमधून, तर गडहिंग्लजचे माजी आमदार (कै.) तुकाराम कोलेकर यांचे पुत्र डॉ. हेमंत हे भाजपच्या तिकिटावर नेसरी गटातून नशीब अजमावत आहेत.  याशिवाय नेत्यांनी आपल्या सुना, भावजयी यांनाही रिंगणात उतरवले आहे. 

वारसदार निवडून आणण्याची रणनीती
काँग्रेसची काही तालुक्‍यांत राष्ट्रवादीसोबत, तर काही ठिकाणी अन्य स्थानिकांसोबत आघाडी आहे. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असला तरी विधानसभेतील पैरा फेडण्यासाठी छुपी युती काहींशी केली आहे. भाजप-ताराराणी ही एकच आघाडी रिंगणात आहे. इतरत्र सोयीच्या आणि विचित्र आघाड्या झाल्या आहेत. त्या करताना हे वारसदार निवडून येतील, अशी रणनीती आखली आहे.

Web Title: son love in politics