
दोन्ही निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीतून जिंकल्या आणि हॅट्रीकमध्ये ते भाजपची सत्ता उलथवत महापौरपदी विराजमान झाले.
सांगली : महापौरपद ....शेतकरी कामगार पक्ष ते राष्ट्रवादी कॉंग्रेस असा प्रवास करीत सांगलीचे पंधरावे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी आपला राजकीय प्रवास आज पुर्ण केला. ते पहिल्यांदा महापालिकेत आले ते महाआघाडीच्या सत्ताकाळात शेकापचे नगरसेवक म्हणूनच. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीतून जिंकल्या आणि हॅट्रीकमध्ये ते भाजपची सत्ता उलथवत महापौरपदी विराजमान झाले.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पारे हे सूर्यवंशी कुटुंबाचे मुळ गाव. दिग्विजय यांचे आजोबा भगवानराव सूर्यवंशी शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी इंग्रजांविरोधात लढाई केली. पुढे शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवाहात सामील होत त्यांनी कॉंग्रेसविरोधात दिर्घकाळ राजकीय लढाई केली. 1962 मध्ये विधानपरिषदेत शेकापचे आमदार म्हणून आले. त्यानंतर त्यांनी सांगली जिल्ह्यात गिरणी कामगार संघटनेच्या माध्यमातून मोठे संघटन उभे केले.
हेही वाचा - ब्रेकिंग : अवघ्या तीन मतांनी गेली भाजपची सत्ता; जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम
भगवानरावांच्या पत्नी सौ. प्रभावती यादेखील शेकापच्या महिला फेडरेशनच्या आघाडीच्या नेत्या होत्या. या दोघांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव ऍड. अजितराव सूर्यवंशी यांनी सांगली नगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला. सूर्यवंशी कुटुंबाचा राजकीय वारसा त्यांनी पुढे नेला. ऍड. अजितराव यांचे धाकटे बंधू कै. प्रदिप मेडिकल व्यवसायात होते. मराठा समाज संस्थेच्या कामकाजात त्यांचा सहभाग असे. प्रदिप यांचे चिरंजीव दिग्विजय यांनी 2008 मध्ये महापालिकेत महाआघाडीच्या सत्ताकाळात प्रवेश केला. महाआघाडीच्या सत्ताकाळात त्यांना पदाची संधी मिळाली नाही. मात्र 2013 मध्ये महाआघाडीचा पराभव झाल्यानंतर महापालिकेत जयंतराव पाटील यांनी त्यांना राष्ट्रवादीच्या गटनेतेपदाची म्हणजेच विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देत विश्वास दाखवला.
लहान वयात त्यांना महत्वाची जबाबदारी मिळाली. ती पार पाडताना त्यांनी नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवला. त्याची पोहच आता त्यांना महापौरपदाच्या निमित्ताने मिळाली आहे. भाजपच्या सत्ता उलथवण्याचा कार्यक्रम ठरला तेव्हा आपल्या विश्वासातील महापौर असावा हे ठामपणे ठरवत जयंत पाटील यांनी दिग्विजय यांना संधी दिली. या पदासाठी त्यांची माजी महापौर मैन्नुद्दीन बागवान यांच्याशी स्पर्धा होती. कारण सध्या महापालिकेत राष्ट्रवादीच्या गटनेतेपदाची धुरा बागवान यांच्याकडे आहे. मात्र पुढची अडीच वर्षे सत्ता राबवताना दिग्विजय यांच्यासारखा विश्वासू व्यक्ती आपल्यासोबत हवा हा धडा मिरज पॅटर्नच्या मागील अनुभवातून जयंत पाटील यांनी घेतला. यामुळे त्यांनी पंधरा दिवसांपुर्वीच दिग्विजय यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. आज मतदानाआधी दहा मिनिटे ते नाव सर्व नगरसेवकांना सांगण्यात आले इतकेच.
हेही वाचा - डावं दाखवून, उजवं हाणलं, जयंत पाटलांनी केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम -
संपादन - स्नेहल कदम