खास महिलांसाठी नगर-पुणे बससेवा (video)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

नगर विभागातर्फे तारकपूर आगारातून महिलांसाठीची नगर-पुणे विशेष बस आज मोठ्या उत्साहात रवाना झाली. हा विशेष बससेवेचा राज्याला प्रेरणादायी ठरणारा पहिलाच प्रयोग नगरमधून सुरू झाला.

नगर : बसस्थानकावर आल्यानंतर बस वेळेवर न मिळणे; बस मिळाली तर बसण्यासाठी जागा न मिळणे असा त्रास महिलांसाठी जिकिरीचा ठरत होता. महिलांची ही अडचण लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागाचे नियंत्रक विजय गिते यांच्या पुढाकारातून "महिला विशेष' बससेवेची संकल्पना पुढे आली.

नगर विभागातर्फे तारकपूर आगारातून महिलांसाठीची नगर-पुणे विशेष बस आज मोठ्या उत्साहात रवाना झाली. हा विशेष बससेवेचा राज्याला प्रेरणादायी ठरणारा पहिलाच प्रयोग नगरमधून सुरू झाला. 44 प्रवासी क्षमता असलेल्या या बसला पहिल्याच दिवशी 43 महिला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला.

पुणे येथे नोकरी-व्यवसाय व शिक्षणासाठी असलेल्या नगरमधील विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. कार्यक्षेत्र पुण्यात असलेल्या महिलांचा प्रवास नगर-पुणे असा नियमित होत असतो. साप्ताहिक सुटीनंतर दर सोमवारी निर्धारित वेळेत कार्यालयात पोचणे गरजेचे असते. नगर-पुणे प्रवास साधारणतः तीन तासांचा आहे.

भल्या पहाटेच पुण्याकडे रवाना

सकाळी दहापूर्वी महिलांना पुण्यातील कार्यालयात पोचायचे असते. त्यासाठी साधन निश्‍चित व सुरक्षित असणे गरजेचे असते. निश्‍चित वेळ गाठण्यासाठी महिला नगरमधून भल्या पहाटेच पुण्याकडे रवाना होतात. त्यामुळे महिलांसाठीच्या बससेवेची विशेष अभिनव संकल्पना पुढे आली. त्यानुसार आज सकाळी सहा वाजता तारकपूर बसस्थानकातून खास महिलांसाठी नगर-पुणे बस पुण्याकडे रवाना झाली.

एसटीचा आणखी एक अभिनव संकल्प

दरम्यान, प्रवासी सेवेचा संकल्प करीत नगर-पुणे पहिली एसटी बस धावल्याला सत्तर वर्षे पूर्ण झाली. प्रवासी सेवेच्या बाबतीत नगरमधील एसटीचा तो निर्णय क्रांतिकारी ठरला होता. आता पुन्हा "महिला विशेष' बससेवेच्या निमित्ताने एसटीचा आणखी एक अभिनव संकल्प आज नगरमधूनच वास्तवात आला.

गुलाबपुष्प देऊन सत्कार

या अभिनव योजनेचा प्रारंभ विभागनियंत्रक गिते यांच्या हस्ते झाला. विभागीय वाहतूक अधिकारी दादासाहेब महाजन, उप यंत्र अभियंता दिलीप जाधव, कर्मचारी, अधिकारी पोपट घाडगे, आगारव्यवस्थापक अविनाश कल्हापुरे, सहायक वाहतूक अधीक्षक विठ्ठल केंगारकर आदी या वेळी उपस्थित होते. या ऐतिहासिक बसमधील महिला प्रवाशांचे तिकीट विभागनियंत्रक विजय गिते यांच्या हस्ते देण्यात आले. बसमधील महिला प्रवाशांचा एसटी प्रशासनातर्फे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या खास बसबद्दल महिलांनीही आनंद व्यक्त केला. 

यांना मिळाला पहिला मान

महिलांसाठी सोडण्यात आलेल्या पहिल्या बसचे चालक सतीश बोडखे, तर वाहक म्हणून संध्या हळगावकर यांना मान मिळाला. हळगावकर यांच्याच हस्ते या बससेवेचा प्रारंभ करण्यात आले. 

प्रत्येक सोमवारी धावणार

प्रत्येक सोमवारी ही नगर-पुणे "महिला विशेष' एसटी बस तारकपूर बसस्थानकातून सकाळी सहा वाजता सुटणार आहे, तर दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पुणे येथील शिवाजीनगर बसस्थानकातून ती नगरसाठी धावणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special Nagar-Pune bus service for women