ठराविक अधिकाऱ्यांच्या आश्रयामुळे मटका रुजला

सुधाकर काशीद
शुक्रवार, 19 जुलै 2019

कोल्हापूर - पोलिसांनी मटकेवाल्यावर कारवाई केली, पोलिसी खाक्‍या दाखविताच एकापाठोपाठ एक मुंबईपर्यंत सावळा बंधू या मुख्य मटका मालकापर्यंतची नावे बाहेर पडली. पैशांचे व्यवहार कसे होत होते, याची बऱ्यापैकी माहिती जमा झाली आहे.

कोल्हापूर - पोलिसांनी मटकेवाल्यावर कारवाई केली, पोलिसी खाक्‍या दाखविताच एकापाठोपाठ एक मुंबईपर्यंत सावळा बंधू या मुख्य मटका मालकापर्यंतची नावे बाहेर पडली. पैशांचे व्यवहार कसे होत होते, याची बऱ्यापैकी माहिती जमा झाली आहे.

मटक्‍याची जंत्री प्रसिद्ध करणाऱ्या ठाण्यापर्यंत पोलिसांची कारवाई जाऊन पोचली. मटकेवाल्यांची एकमेकांशी फोनाफोनी कशी होत होती. ‘लोड’ फिरवाफिरवीची तंत्रे कशी असतात, याचीही कला कळाली. हे सर्व म्हणजे तळापासून वरपर्यंतचे मटकेवाले आजही पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि या मटकेवाल्यांना पोलिसांतून कोणाचा कसा आणि किती वरदहस्त होता, ही माहिती मटकेवाल्यांकडून काढून घेणे शक्‍य आहे. 

कारण काही ठराविक अधिकाऱ्यांनी यापूर्वी व आता मटक्‍याला आश्रय दिला. म्हणूनच कोल्हापुरात मटका रुजला हे सत्य आहे, आणि मटक्‍याची पाळेमुळे खणून काढताना ही माहितीही खूप महत्त्वाची ठरणार आहे. मटका, जुगार वाईटच आहे; पण हे माहीत असून त्याला आश्रय देणारे काही जण त्याहूनही वाईट आहेत. कोल्हापुरात मटकेवाल्यांचे राज्य वसले ते अशा या पद्धतीमुळेच. यापूर्वी एकदा थेट एका वृत्तवाहिनीवर एका मटकाकिंगने आपण कोणाला किती हप्ता देतो, हप्ता वसूल करायला कोण येतो. हप्त्याशिवाय अन्य काही खर्च ठराविकांना कसा करावा लागतो, याची उघड जंत्रीच मांडली होती.

विशेष हे की, त्याला प्रत्युत्तर देण्याचे किंवा त्या मटकेवाल्याची मुलाखत खोटी आहे, असे पुढे येऊन सांगायचे धाडस त्या वेळच्या एकाही पोलिसाकडून किंवा अधिकाऱ्याला झाले नाही. अर्थात कोल्हापूर पोलिस दलातला प्रत्येक जण या मटकेवाल्यांच्या हप्त्याच्या साखळीत अडकला होता, असे अजिबात नव्हते; पण ठराविक अधिकाऱ्यांनी मटक्‍याला पूर्ण अभय दिले होते आणि त्यामुळेच काही पोलिस मटकेवाल्यांसाठीच काम करत होते. त्यांनी मटकेवाल्यांचे बळ निश्‍चित वाढवले.

वरिष्ठांनी आणखी लक्ष घालण्याची गरज
विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिसप्रमुख तिरुपती काकडे, शहर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे व येथून बदलून गेलेल्या अतिरिक्‍त पोलिसप्रमुख ऐश्वर्या शर्मा यांच्या सांघिक कामगिरीमुळे हे चित्र नक्की बदलले. मला कोण काय करू शकतो, या अाविर्भावात इचलकरंजीत वावरणारा संजय तेलनाडे दोन महिने फरारी आहे. कोल्हापुरातला सम्राट पळून खेळतो. बाकीचे ४२ जण मोका कारवाई अंतर्गत कोठडीत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आणखी थोडे लक्ष घालण्याची गरज आहे. कारण काही अधिकाऱ्यांना लागलेली चटक अद्यापही कायम आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special story on Kolhapur Mataka