महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

हैदराबाद येथील सी पथकांबाबत तेथील आयुक्तांशी बोलणे झाले आहे. परिक्षेत्रातील दहा महिला अधिकाऱ्यांना तेथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्रात ही पथके कार्यरत होतील.

-विश्‍वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र 

कोल्हापूर परिक्षेत्रातील ५ जिल्ह्यांतील १४२ पोलिस ठाण्यांत नवा प्रयोग

कऱ्हाड - महिलांच्या सुरक्षिततेसाठी हैदराबाद येथे असलेल्या सी पथकांच्या धर्तीवर कोल्हापूर परिक्षेत्रातही स्वतंत्र पथके तयार केली जाणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली. परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील १४२ पोलिस ठाण्यांत ही पथके लवकरच कार्यरत होतील. 

कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर व पुणे ग्रामीणचा भाग येतो. त्या प्रत्येक जिल्ह्यात विशेष योजना हाती घेतली जाणार आहे. त्यात महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. हैदराबाद येथे सी पथके कार्यरत आहेत. त्या पथकांचे काम देशात अव्वल आहे. त्या पथकांच्या धर्तीवर परिक्षेत्रातील जिल्हानिहाय प्रत्येक पोलिस ठाण्यात तशी पथके स्थापन करण्यात येणार आहेत. या पथकांना काय नाव असावे, याबाबत अद्यापही विचार झालेला नसला, तरी त्यांची कार्यनिश्‍चिती तयार झाली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून महाविद्यालयांसह शाळांची माहिती संकलित करून तेथे पोलिसांनी त्यांचे ‘रिलेशन’ वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिक्षेत्रातील दहा महिला अधिकाऱ्यांना हैदराबाद येथे सी पथकाचे काम कसे चालते, याचे प्रशिक्षण देण्यासाठी पाठवले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर या महिला अधिकाऱ्यांनी परिक्षेत्रात पथकांची बांधणी करायची आहे. प्रत्येक पथकात सहा महिला पोलिस व अन्य पोलिस मित्र महिलांचा समावेश असणार आहे. सारी पथके एकमेकांशी जोडली जाणार आहेत. त्यांचा नियंत्रण कक्ष कोल्हापुरात असेल. कोल्हापूर जिल्ह्यात तीस, साताऱ्यात २७, सांगलीला २५ व पुणे ग्रामीणला ३६ पोलिस ठाणी आहेत. त्या प्रत्येक पोलिस ठाण्यात एक पथक कार्यरत राहणार आहे. 

 

या पथकांच्या कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून पोलिस शाळा- महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थिनींना त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या विशेष गुन्ह्यांबद्दल मार्गदर्शन करून माहिती देतील. महिलांबाबत घडणारे सायबर गुन्हे, अपहरण, बलात्कार, ओळखीच्या लोकांकडून होणारे गुन्हे, छेडछाडीचे गुन्हे, दहशतवादी संघटनांचे आकर्षित करणारे जाळे आदी बाबींची विद्यार्थिनींना माहिती दिली जाईल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या विविध ॲप्लिकेशनची माहितीही दिली जाईल. त्याची जबाबादारी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. 

Web Title: Special teams for the women's safety

टॅग्स