#Specialtyofvillage ट्रकसोबत धावतंय मुदाळचं जगणं

#Specialtyofvillage ट्रकसोबत धावतंय मुदाळचं जगणं

भुदरगड तालुक्‍याचे प्रवेशद्वार म्हणजे मुदाळ. या गावात सर्वाधिक ट्रक असल्याने परिसरात हे ट्रकचं गाव म्हणून ओळखलं जातं. गावाचं अर्थकारण याच व्यवसायावर आधारित आहे. कारण अनेक कुटुंबांचा ट्रक व्यवसाय हाच उदरनिर्वाहाचा मार्ग बनला आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांचे हे गाव. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही हा व्यवसाय जपला आहे. आजघडीला गावात ३८७ ट्रक आहेत.

पूर्वीच्या काळी मुदाळ गाव फार प्रगत नव्हते. कारण शेती पावसावर अवलंबून होती. त्यामुळे १९५२ मध्ये अनेक कुटुंबांनी उदरनिर्वाहासाठी मीठ व्यवसायात पाय रोवले. भुदरगडसह शेजारील तालुक्‍यातील गावागावांत बैलगाडीने धान्यांच्या मोबदल्यात मीठ विकले. कारण तेव्हा पैसे कमी, धान्य जास्त चलनात होते. १९५४ मध्ये गावातील सरपंच (कै.) परशराम बाळाजी पाटील यांनी ‘सोरोलेट’ कंपनीचा ट्रक घेतला. त्यानंतर (कै.) गोपाळ पाटील यांनी १९५६ मध्ये याच कंपनीचा ट्रक घेतला. त्या काळी ट्रक सुरू करण्यासाठी कोळशाचा वापर केला जात असे. तेव्हा गावात ट्रकबाबत प्रचंड कुतूहल होते. 

(कै.) गोपाळ पाटील यांनी पहिला ट्रक घेतला; तेव्हा त्यांचा व्यवसायाच्या माध्यमातून रत्नागिरीतील एका मीठ व्यापाऱ्याशी संपर्क आला. त्यांनी पाटील यांना मीठ व्यवसायात उतरविले. यानंतर गावात मीठ व्यवसाय जोमाने सुरू झाला. बैलगाडीतून परिसरातील गावात मीठ विक्री सुरू झाली. काही कालावधीनंतर या व्यवसायाच्या जोरावर काहींनी ट्रक व्यवसायाकडे वाटचाल केली. शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणामुळे अनेक कुटुंबांनी ट्रक व्यवसायावर भर दिला.                      
के. पी. पाटील बिद्री साखर कारखान्याचे संचालक झाले, तेव्हा १९७७ मध्ये कारखान्याचे अध्यक्ष (कै.) हिंदूराव पाटील होते. त्यावेळी त्यांनी कारखान्याच्या सहकार्याने ट्रक व्यवसाय करू इच्छिणाऱ्या गावकऱ्यांना एकत्र केले. एकाच वेळी टाटा कंपनीचे सुमारे १४ ट्रक आर्थिक हप्त्यावर गावात आणले. त्यांच्या ट्रकचे ऊस वाहतुकीसाठी करार केले. त्यानंतर खऱ्या अर्थानं गाव ट्रक व्यवसायाकडे वळले. १९८० नंतर माल वाहतूक, लाकूड, ऊस वाहतुकीसाठी घेतलेल्या ट्रकची संख्या ५० पर्यंत पोचली. ट्रकची संख्या वाढल्यानंतर अनेकजण चालक, क्‍लिनर झाले. बॅंकांनी आर्थिकदृष्ट्या सहकार्य केल्यानेच अनेकांचे धाडस वाढत गेले. त्यातून ट्रकची संख्या वाढत गेली आणि गावातील उलाढालही.

ट्रक व्यवसायातून गावात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत गेली. अनेक कुटुंबांची भरभराट होत गेली. सध्या अनेक ट्रकचालक स्वत: मालक बनले. काही एस. टी. चालक बनले आहेत. साधारणत: १९९९ मध्ये परिसरात साखर कारखान्यांची वाढलेली संख्या पाहता बॉक्‍साईट वाहतुकीमुळे ट्रक व्यवसायाने अधिक गती घेतली. आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत ट्रक व्यवसाय झाल्याने गाव वाहनांनी गजबजले आणि ‘ट्रकचं गाव’ अशी वेगळी ओळख मुदाळ गावाची निर्माण झाली.

ट्रक आणि मुदाळ समीकरणच
ट्रक आणि मुदाळ असे आमच्या गावाचं समीकरण बनले आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. दोन-तीन पिढ्यांनी हा व्यवसाय स्वीकारला. अनेक कुटुंबांना यातून आर्थिक स्थैर्य मिळाले. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण झाले; मात्र सध्या अनेक कारणांनी ट्रक व्यवसाय अडचणीत आला आहे. यातून मार्गक्रमण करीत व्यवसाय जपणे मालकांपुढे मोठे आव्हान आहे, असे माजी आमदार के. पी. पाटील यांनी सांगितले.

वाढती महागाई, डिझेल, ऑईल दरवाढ, ट्रक मालकांची ऊस तोडणी मुकादमाकडून होणारी फसवणूक अशा अनेक कारणांनी ट्रकमालक चिंतेत आहेत. वाहन उद्योगातील तीव्र स्पर्धा, एकूण उत्पन्न, बॅंक कर्ज आणि त्याचे व्याज, नोकर पगार या सर्व बाबींचा विचार ट्रकमालकांना करावा लागत आहे. यातून ट्रक व्यवसायासमोर संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे.
- प्रकाश पाटील,
व्यावसायिक.

गारगोटी-कोल्हापूर आणि निपाणी-राधानगरी या प्रमुख मार्गांवरील मुदाळतिट्टा हे महत्त्वाचे ठिकाण. मुदाळबरोबरच बाहेरील अनेक ट्रक येथे दुरुस्तीसाठी आणतात. त्यामुळे ट्रक दुरुस्तीचे हे प्रमुख केंद्र बनले आहे. या परिसराला बाजारपेठेचे स्वरूप आले आहे. ट्रक बॉडी, रंग, पत्राकाम, सजावट, मेकॅनिक, स्पेअर पार्ट, पंक्‍चर काढणे यांसारखे रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत.
- के. ए. पाटील,
स्पेअर पार्ट विक्रेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com