गाव माझं वेगळंः ट्रॅक्‍टर हाच इंचनाळचा थाट !

अवधूत पाटील
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर, सांगली, बेळगाव आणि काेकणात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपणारी व आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अनेक गावं आहेत. अख्ख्या जगात ‘गाव माझं वेगळं’ असं अभिमानानं मिरविणाऱ्या या आगळ्यावेगळ्या गावांविषयी ‘हटके’ माहिती देणारी ही मालिका...

इंचनाळच्या (ता. गडहिंग्लज) कोणत्याही गल्लीत फिरा, हमखास आठ-दहा ट्रॅक्‍टर नजरेस पडणारच. साडेआठशे उंबरा असणाऱ्या या गावात ११५ ट्रॅक्‍टर आहेत. साधारणपणे प्रत्येक आठ घरांमागे एक ट्रॅक्‍टर मालक आढळतो. या ट्रॅक्‍टरनेच गावाला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. निव्वळ ट्रॅक्‍टरमध्ये सुमारे दहा कोटींची गुंतवणूक झाली आहे.

गावात फटफटी वाजली तरी साऱ्यांच्या रस्त्याकडे नजरा भिरभिरायच्या. तिचा आवाज येणे बंद होत नाही, तोवर त्या खिळलेल्या असायच्या. १९८०-९० च्या दशकात वाहनांबाबत कमी अधिक प्रमाणात ग्रामीण भागात. सर्वत्रच ही परिस्थिती होती. अशा काळात इंचनाळमधील ट्रॅक्‍टरची संख्या तब्बल पन्नासच्या घरात होती. यावरून इंचनाळकरांचे ट्रॅक्‍टर प्रेम फारच जुने असल्याचे दिसून येते. औद्योगिकरणाचे वारे वाहायला लागल्यानंतर त्यामध्ये आणखीनच भरच पडली. एक-एक करीत ती संख्या वाढून सध्या ११५ पर्यंत पोचली आहे.

आजोबा गणपतराव देसाई यांनी १९५० मध्ये लोखंडी चाकांचा ट्रॅक्‍टर आणला होता. १९६८ मध्ये वडील बाजीराव देसाई यांनी फर्ग्युसन कंपनीचा ट्रॅक्‍टर आणला. पंचक्रोशीतील पहिलाच ट्रॅक्‍टर होता. त्यावेळी त्‍याची किंमत ३६ हजार होती.
- दत्ताजीराव देसाई,
शेतकरी, इंचनाळ

सध्या गावात इतक्‍या मोठ्या संख्येने ट्रॅक्‍टर दिसत असले तरी पहिला ट्रॅक्‍टर आणण्याचा मान जातो  तो कै. गणपतराव देसाई यांच्याकडे. त्यांनी १९५० मध्ये लोखंडी चाकांचे ट्रॅक्‍टर आणले होते. ट्रॅक्‍टरसोबतच पाच वर्षे दुरुस्तीसाठी आवश्‍यक असणारे स्पेअर पार्टस्‌ही देण्यात आले होते; मात्र ते फार काळ चालविता आले नाहीत.

त्यानंतर त्यांचे चिरंजीव कै. बाजीराव देसाई यांनी १९६८ मध्ये गोव्यावरून मॅसी फर्ग्युसन कंपनीचा ट्रॅक्‍टर आणला. इंचनाळ पंचक्रोशीतील हा पहिलाच ट्रॅक्‍टर. तो पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असे. अनेकांना ट्रॅक्‍टर चालतो कसा, शेतात काम करतो कसा, याचेच मोठे अप्रूप वाटत असे.

ट्रॅक्‍टरची संख्या वाढण्यामागे कारणही तसेच आहे. इंचनाळला साडेसातशे एकर शेती क्षेत्र आहे. गावाला हिरण्यकेशीचा नदीकाठ लाभला आहे. त्यामुळे सर्व शेती बागायती आहे. नदीचे मुबलक पाणी असल्याने नगदी पीक म्हणून उसालाच प्राधान्य दिले जाते. त्यातच गावापासून अवघ्या तीन किलोमीटरवर गडहिंग्लज साखर कारखाना आहे. या साऱ्या गोष्टींच्या सकारात्मक परिणामातून गावाला सधनता लाभली आहे. साहजिकच यातून शेतीसाठी असेल किंवा अन्य कोणत्याही बाबतीत मोठी गुंतवणूक करताना हात आखडता घेण्यास कारणच शिल्लक राहत नाही. तेच इंचनाळकरांच्या ट्रॅक्‍टर प्रेमाबाबत झाले आहे.

सुरवातीला ट्रॅक्‍टरचा उपयोग प्रामुख्याने स्वत:च्या शेतातील कामासाठी केला जात होता. त्यानंतर इतरांच्या शेतीच्या कामासाठीही भाडेतत्त्वावर वापर होऊ लागला. त्यामुळे व्यवसाय म्हणून ट्रॅक्‍टर घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली. कालांतराने ऊस हंगामात कारखान्याकडे करार केले जाऊ लागले. कारखान्याकडे करार झाल्यास स्वत:सह जवळच्या संबंधितांचा ऊस लवकर गाळपाला पाठविता येऊ शकतो, हे गणित उकलले. त्यासोबत व्यवसायही होऊ लागला. त्यामुळे कारखान्याकडे करार करण्यासाठीही ट्रॅक्‍टर घेणारे वाढले. यातूनच अनेकांकडे एकापेक्षा अधिक ट्रॅक्‍टर झाले आहेत.

या कंपन्यांचे आहेत ट्रॅक्‍टर...
- मॅसी फर्ग्युसन 
- एचएमटी
- जॉन डिअर 
- न्यू हॉलंड 
- सोनालिका 
- महिंद्रा
- स्वराज्य

 दहा कोटींची गुंतवणूक...
गावात निव्वळ ट्रॅक्‍टरमधील गुंतवणूक सुमारे दहा कोटींपर्यंत गेली आहे. नवीन ट्रॅक्‍टरची किंमत साधारणपणे सात ते आठ लाखांच्या घरात आहे. याशिवाय प्रत्येकी दोन ट्रॉली, शेती कामासाठी गरजेच्या पलटी, रोटर, कल्टीव्हेटर आदी साहित्यांची रक्कम पाच ते सहा लाखांच्या घरात जाते. सद्यःस्थितीत ट्रॅक्‍टर व त्यांच्या साहित्याची ५० टक्के किंमत धरली तरी ती १० कोटींच्या घरात जाते.

हॅंडलने सुरू होणारा ट्रॅक्‍टर...
आनंदराव पोवार यांचे वडील कै. धोंडीबा पोवार यांनी १९८० च्या दरम्यान आयशर कंपनीचा ट्रॅक्‍टर खरेदी केला होता. त्या काळी ५० हजार रुपये मोजले होते. या ट्रॅक्‍टरचे वैशिष्ट्य म्हणजे तो सुरू करण्यासाठी स्टार्टर होताच; पण स्टार्टरवर सुरू झाला नाही तर हॅंडल फिरवून ट्रॅक्‍टर सुरू करण्याची व्यवस्था होती.

यांचे एकापेक्षा अधिक ट्रॅक्‍टर...
 चार ट्रॅक्‍टरचे मालक : शिवाजी राणे, मोहन पोवार, सयाजीराव देसाई.
 तीन ट्रॅक्‍टरचे मालक : दत्ताजीराव देसाई, किशोर होडगे, विलास पाटील, बाळासाहेब पोवार.
 याशिवाय दोन ट्रॅक्‍टर असणाऱ्यांची संख्या पंचवीसच्या घरात आहे.

Web Title: Specialty Of Village Inchanal Tractor Village