#Specialtyofvillage दुमजली घर नसलेलं खटाव

संतोष भिसे
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर, सांगली, बेळगाव आणि काेकणात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपणारी आणि आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अनेक गावं आहेत. अख्ख्या जगात ‘गाव माझं वेगळं’ असं अभिमानानं मिरविणाऱ्या या आगळ्यावेगळ्या गावांविषयी ‘हटके’ माहिती देणारी ही मालिका...

काही परंपरा थेट मानवी जीवनावर परिणाम करतात. परंपरेत जखडल्याने गावकऱ्यांची जगरहाटी बदलून जाते. श्रद्धेच्या पगड्याने म्हणा किंवा आलेल्या अनुभवांमुळे म्हणा, परंपरेच्या पालनाचा कसोशीने प्रयत्न सुरू राहतो. कालांतराने ती गावची ओळख बनून जाते; वैशिष्ट्य ठरते. सांगली जिल्ह्यातील खटाव असेच जगावेगळे गाव. या गावात एकही दुमजली घर नाही. श्रद्धा हीच की ग्रामदैवत सोमेश्‍वर मंदिराच्या शिखरापेक्षा उंच घर बांधले तर ते टिकत नाही.

खटावमध्ये माडीचं घर नाही. आज तंत्रज्ञानाच्या युगात अशी काही श्रद्धा टिकायची नाही. ती अधिक दृढ झाली ती सुमारे पंधरा वर्षांपूर्वी. एका शिक्षित नोकरदाराने दुमजली घर बांधले आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबात मृत्युसत्र सुरू झाले म्हणे. त्यानं गाव सोडलं; मग दुसऱ्यालाही तोच अनुभव. मग त्याने पहिला मजला पाडून टाकला. आता याची सत्यता तपासण्याच्या खोलात कोणी गेला नाही आणि पुन्हा तसं माडीचं घरही कोणी बांधले नाही.

सांगलीपासून पूर्वेला ३० किलोमीटर आणि मिरजेपासून २२ किलोमीटरवरचे हे छोटं गाव. गायरान संपले की पलीकडे कर्नाटक. त्यामुळे सर्वांची बोलीभाषा कन्नड. सुमारे चार हजार लोकसंख्येच्या या गावात ९५ टक्के लिंगायत. ग्रामदैवत सोमेश्‍वरावर सर्वांची अपार श्रद्धा.  दहा-पंधरा वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी देखणा सभामंडप बांधला. मेच्या पौर्णिमेला दोन दिवसांची यात्रा भरते. गावओढ्याजवळ यल्लम्माचे मंदिर; तिची यात्राही डिसेंबरमध्ये. इथे सर्रास लोक मळ्यांमध्ये राहतात.

आता या गावातून शिक्षक, पोलिस, ग्रामसेवक असे नोकरदारही दिसतात. गाव पांढरी या संज्ञेला शोभेशी घरे सर्वत्र आढळतात. पांढऱ्या मातीतली सारी घरे. काळाच्या ओघात काही आरसीसी झाली तरी त्यांना मजला नाही. शिक्षण आणि नोकऱ्यांमुळे सुबत्ता आली तरी या प्रथेला कोणी फाटा द्यायचे धाडस करीत नाही. घराचा आडवा विस्तार करून जागेची गरज भागवली जाते. गावातले हायस्कूल, ग्रामपंचायत किंवा अन्य सार्वजनिक, शासकीय इमारतीबाबतही हे पथ्य पाळले जाते. कोणी मजला करायला गेला तर जुनी-जाणती अनुभवी मंडळी त्याला आवर घालतात. मग नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेलेली मंडळी बाहेरगावी सांगली-मिरजेला जवळ करत माडीच्या घराची हौस भागवतात.

गावपांढरीत अनेक रूढी पाळल्या जातात. त्यामागे श्रद्धा असतात. त्याची कारणमीमांसा होत नाही. त्यामुळे श्रद्धेचे जोखड होऊन जातात. इथे पांढऱ्या मातीमुळे जमिनीत खोलवर पाया मिळत नाही; त्यामुळे जास्त उंचीच्या इमारती टिकाव धरत नाहीत. दुमजली घरे टाळण्यासाठी मग अशी श्रद्धेची बंधणे तयार होतात. मग ती डोळे झाकून पाळली जातात.
- मानसिंगराव कुमठेकर,
इतिहास संशोधक

बांधकाम क्षेत्रात सध्या अनेक नवी तंत्रे आली आहेत. पांढऱ्या पायातही आरसीसी घरे बांधली जाऊ शकतात. खटावकरांनी परंपरेची सत्यता पडताळून आता दुमजली घरे बांधण्यास पुढे यायला हवे. यातली एक गोष्ट चांगली की पारंपरिक घर बांधकामाची जपणूक होतेय.
- श्रीकांत पाटील,
स्थापत्य अभियंता

गुढी पाडव्यापासून दसऱ्यापर्यंतच्या प्रत्येक अमावस्येला ग्रामदैवत सोमेश्‍वर आणि अमोघसिद्धाला पोळी-भाताचा नैवेद्य दिला जातो. एक किलो गहू, तितकाच तांदूळ आणि अर्धा किलोच्या गुळाच्या पोळ्या व भात तयार करतात. अमावस्येच्या रात्री तो देवतांना अर्पण केला जातो. या नैवेद्याला कटबाण म्हणतात. तो कन्नड शब्द आहे. अशा परंपरांची चिकित्सा केल्यास तार्किक विचारांना बळ मिळेल.’’
-रावसाहेब बेडगे,
माजी उपसरपंच

शिखरापेक्षा उंच घरे नकोत!
‘ग्रामदैवत सोमेश्‍वराचे घुमट जमिनीपासून तीस फुटांवर आहे. त्यापेक्षा उंच नको, अशी सर्वांची श्रद्धा. ती काही कुणावर सक्ती नाही. मळ्यातले लोकही ही श्रद्धा पाळतात. काही कुटुंबांनी घरातल्या घरात माळवद स्वरूपात छोटा कप्पा करून माडी केली आहे. सांगितले जाते की, आमचे गाव दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हते. सध्याच्या गावठाणापासून दोन-तीन किलोमीटरवर हळ्ळूर नावाचे गाव होते. साथीच्या आजाराने गाव ओस पडले आणि सारे इथे आले. त्यांनी सोमेश्‍वराची प्रतिष्ठापना केली. त्यांच्या कृपेने साथ गेली. याच कारणास्तव दुमजली घरे बांधली जात नसावीत, असे माजी उपसरपंच रावसाहेब बेडगे यांनी सांगितले.

Web Title: Specialty of village no second floor house in village Khatav