#Specialtyofvillage देवर्डेतील तरुणांचे राज्यात ५० बझार

#Specialtyofvillage  देवर्डेतील तरुणांचे राज्यात ५० बझार

सांगली जिल्ह्यातील देवर्डे (ता. वाळवा) या जेमतेम १३०० च्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या गावातील तरुणांनी राज्यातील विविध जिल्ह्यांत ५० हून अधिक बझार उभे केले आहेत. त्याहून शंभर एक तरुणांचे करिअर झाले आहे. त्याशिवाय त्या-त्या शहरात, गावात प्रत्येकी किमान सातशेहून अधिक स्थानिकांना रोजगार मिळाला. बझारवाल्यांचे देवर्डे अशी वेगळी ओळख या गावाने निर्माण केली आहे.

वाळवा तालुक्‍यातील देवर्डे गाव. चांदोली धरण झाल्यानंतर वारणा नदीच्या पाण्याने सुजलाम्‌ सुफलाम्‌ झालेला परिसर. चिकुर्डे व ऐतवडे खुर्द ही दोन मोठी गावे लागूनच. मर्यादित शेतजमीन, दुधाचा जोडधंदा असा येथील शेतकऱ्यांचा नित्यक्रम. काही तरुण साखर कारखाने, दूध संस्था व इतर ठिकाणी छोटी-मोठी नोकरी करतात.

अशी झाली सुरवात
दिनकर नायकवडी येथील तरुणांच्या बझारनिर्मितीमागील ऊर्जाकेंद्र आहे. नायकवडी यांनी १९८६ मध्ये वारणा बझारमध्ये सेल्समन म्हणून नोकरीस सुरवात केली. आठ तासांची नोकरी हे सूत्र न ठेवता मन लावून अनेक बारकावे आत्मसात केले. गोदाम कीपर म्हणून अनेक अनुभव पदरी बांधता आले. पुढे नोकरी सोडून त्यांनी काही काळ शेती केली. अनुभवाच्या जोरावर त्यांनी फलटण, पेण, अलिबाग येथे व्यवस्थापक म्हणून काम केले.

बझारनिर्मितीचा श्रीगणेशा
माजी आमदार मानसिंगराव नाईक यांना शिराळ्यात बझार काढायचा होता. त्यासाठी त्यांनी पेण येथे दिनकर नायकवडी यांच्याबरोबर चर्चा केली व शिराळा येथे आपला बझार सुरू करण्याचे निश्‍चित केले. नायकवडी यांनी अल्पावधीत बझार नावारूपास आणला. बझारची निर्मिती होईपर्यंत लोक निवडक  माल आणि दराबाबत अनभिज्ञ होते, असे नायकवडी यांनी सांगितले.

५० हून अधिक बझारची निर्मिती
सुरवातीचा प्रयोग यशस्वी झाल्यावर इतर तरुण याकडे आकर्षित झाले. काहींनी भागीदारीमध्ये बझार सुरू केले. त्यामुळे देवर्डेतील तरुणांचे सांगली जिल्ह्यात नऊ, कोल्हापूर जिल्ह्यात सात, नाशिक पाच, सातारा  सहा, नगर आठ, रायगड पाच आदी जिल्ह्यांसह कोकणात सहा, कर्नाटकात आठ बझार जोमात सुरू आहेत. आजमितीला दीपक शिंदे, संदीप नायकवडी, जयवंत शिंदे, अनिल पाटील आदींसह ५० हून अधिक तरुण याचे नेतृत्व करीत आहेत. व्यवसायात काम करणाऱ्या तरुणांना दिनकर नायकवडी यांची मदत मिळाली आहे.  

मराठा समाजाचे व्यवसायावर शिक्कामोर्तब
व्यापार करणे म्हणजे ठराविक समाजाची मक्तेदारी असे मानले जायचे; परंतु देवर्डेतील तरुणांनी ती रद्दबादल ठरविली. व्यापाऱ्याचा कोणताही गंध नसताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर बझारच्या व्यवसायात पाय घट्ट रोवले आहेत. गावातील तरुणांबरोबर बाजूच्या गावातील त्यांचे नातेवाइकही या व्यवसायात उतरले आहेत. त्यांचेही वीसच्या आसपास बझार तयार झाले आहेत. १०० हून अधिक तरुण या व्यवसायात िस्थर झाल्याने त्यांची आर्थिक, सामाजिक परिस्थिती, राहणीमान यात सुधारणा झाली. व्यवसायानिमित्ताने तरुण बाहेर असतात. वरचेवर भेट होत नाही; परंतु फोनवर बोलणे होते. गावातील यात्रेला या तरुणांची बऱ्यापैकी भेट होते. नायकवडी यांनी घालून दिलेल्या वाटेवरून हे तरुण यशस्वी झाले आहेत. नायकवडी सध्या प्रचिती दूध संघात एमडी आहेत.

तरुणांना दिली दिशा
आपल्या बरोबर गावची प्रगती व्हावी, तरुणांना काम मिळावे, अशी तळमळ नायकवडी यांना कायम असे. त्यातून त्यांनी सुरवातीला चार तरुणांना एकत्र करून बझारनिर्मितीची संकल्पना सांगितली. तरुणांनी स्वभांडवल तयार करून व्यवसायास सुरवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com