चिंब पावसातही शाही दसरा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - हादग्याच्या चिंब पावसाने हजेरी लावूनही पारंपरिक उत्साहात काल (ता. ११) दसरा चौकात शाही दसरा सोहळा साजरा झाला. सोने लुटण्याच्या या सोहळ्यासाठी तमाम कोल्हापूरकरांनी सहकुटुंब हजेरी लावली. दरम्यान, सोने लुटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी परतीच्या दिशेने निघाल्या असताना अचानक पावसाने हजेरी लावली; मात्र काही काळ थांबून पुन्हा उत्साहाला उधाण आले. भर पावसात पालख्यांचे जोरदार स्वागत झाले. 

कोल्हापूर - हादग्याच्या चिंब पावसाने हजेरी लावूनही पारंपरिक उत्साहात काल (ता. ११) दसरा चौकात शाही दसरा सोहळा साजरा झाला. सोने लुटण्याच्या या सोहळ्यासाठी तमाम कोल्हापूरकरांनी सहकुटुंब हजेरी लावली. दरम्यान, सोने लुटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी परतीच्या दिशेने निघाल्या असताना अचानक पावसाने हजेरी लावली; मात्र काही काळ थांबून पुन्हा उत्साहाला उधाण आले. भर पावसात पालख्यांचे जोरदार स्वागत झाले. 

श्री महालक्ष्मीची तिरुपतीहून आलेल्या शालूतील रथातील रूपात पूजा बांधण्यात आली. परंपरेनुसार सूर्य अस्ताला जाण्याच्या क्षणावर सायंकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी अमाप उत्साहात सोने लुटण्याचा सोहळा झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भवानी मंडपातून पारंपरिक लवाजमा निघाला. लवाजम्यामागे भवानी व गुरुमहाराजांची पालखी होती. त्या पाठोपाठ महालक्ष्मीची पालखीही आली. पालख्यांचे दसरा चौकात आगमन झाल्यानंतर काही वेळातच नवीन राजवाड्यातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती, राजकुमार यशराजराजे छत्रपती पोलिस संचलनातील वाहनांच्या ताफ्यासह ‘मेबॅक’ मोटारीतून दसरा चौकात आले. त्यांच्या हस्ते चौकातील शमीच्या पानांचे पूजन झाले. त्यानंतर सोने लुटण्याचा थरार दसरा चौकाने अनुभवला. लुटलेले सोने एकमेकांना देत ‘सोने घ्या, सोन्यासारखे राहा’ अशा शुभेच्छांची देवाण-घेवाण सुरू झाली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांसह सारे जण मेबॅक मोटारीतून करवीरवासीयांच्याकडून सोने स्वीकारत महालक्ष्मी मंदिराकडे गेले. तेथे त्यांनी देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, शाही दसरा सोहळ्यासाठी महापौर अश्‍विनी रामाणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, समरजितसिंह घाटगे, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, शहर पोलिस उपअधीक्षक भरतकुमार राणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

विक्रेत्यांवर संक्रांत
दसरा सोहळ्यासाठी दसरा चौकात विविध करमणुकीची साधने, खेळणी व खाद्यपदार्थांचे स्टॉल सजले होते. त्यासाठी विक्रेत्यांनी दोन दिवस कष्ट घेतले; मात्र सोने लुटण्याचा सोहळा संपताच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेकांनी खरेदी न करताच घरी जाणे पसंत केले. त्यामुळे या विक्रेत्यांच्या उत्साहावर मात्र विरजण पडले.

पालखीचे थाटात स्वागत
श्री महालक्ष्मीची पालखी परंपरेप्रमाणे सिद्धार्थनगरातून मंदिरात पुन्हा गेली. सिद्धार्थनगर, जुना बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, गंगावेस या मार्गावर पालखीचे जोरदार स्वागत झाले. रात्री नऊच्या सुमारास पालखी पंचगंगा हॉस्पिटलजवळ होती. विद्युतरोषणाईसह फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या, प्रसाद वाटप अशा थाटात पालखीचे स्वागत झाले.

Web Title: ssahahi dasara celebration in kolhapur