दहावीचे विद्यार्थी ‘आयटीआय’पासून वंचित?

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 13 जून 2018

सातारा - राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व अन्य महत्त्वपूर्ण दस्तऐवज २२ जून रोजी दुपारी तीननंतर शाळांमधून प्राप्त होणार आहेत. आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांनी २१ जूनला मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश अर्ज निश्‍चित करणे अपेक्षित आहे. मूळ दस्तऐवज मिळण्यापूर्वी प्रवेश अर्ज निश्‍चिती कशी होणार? याची चिंता राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना लागली आहे.

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया  http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी २० जूनपर्यंत प्रवेश अर्ज भरणे, २१ जूनला मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश अर्ज निश्‍चित करणे अपेक्षित आहे. प्रवेश अर्ज निश्‍चितीसाठी विद्यार्थ्यांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची गुणपत्रिका, अलीकडील शिक्षण घेतलेले शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड या तीन गोष्टी प्रामुख्याने सादर करणे बंधनकारक आहे. हा अर्ज विद्यार्थ्यांनी नजीकच्या आयटीआयमध्ये जाऊन शुल्क भरून निश्‍चित करणे आवश्‍यक असते. अर्ज स्वीकृती केंद्रातील अधिकारी हे अर्जाची छापील प्रत व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मूळ दस्तऐवजावरून काळजीपूर्वक तपासणी करून अर्जाचे निश्‍चितीकरण करतात तसेच विद्यार्थ्यांना त्याची पावती व प्रत देतात.

प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार निश्‍चित केलेल्या प्रवेश अर्जांचाच सर्व प्रवेश फेऱ्यांकरिता विचार केला जातो. निश्‍चित न केलेले अर्ज प्राप्तच झाले नाहीत, असे समजले जाते. यामुळे सद्य:परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळांतून मूळ दस्तऐवज २२ जूनला प्राप्त होणार असल्याने आयटीआय प्रवेशोच्छुक विद्यार्थी २१ जूनला अर्ज निश्‍चिती कसे करणार, याची चिंता पालकांना लागली आहे. 

...असे आहे वेळापत्रक 
    ऑनलाइन अर्ज करणे : २० जूनपर्यंत
    प्रवेश अर्ज निश्‍चित करणे : २१ जूनपर्यंत
    पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम भरणे - २२ जूनपर्यंत
    प्राथमिक गुणवत्ता यादी -२५ जून रोजी सकाळी ११ वाजता
    गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे - २५ ते २६ जून
    अंतिम गुणवत्ता यादी : २८ जून रोजी सायंकाळी पाच वाजता
    पहिली प्रवेश फेरी : तीन ते सहा जुलै
    दुसरी प्रवेश फेरी : १३ ते १७ जुलै
    तिसरी प्रवेश फेरी : २५ ते २८ जुलै
    चौथी प्रवेश फेरी : चार ते आठ ऑगस्ट

Web Title: ssc student ITI mission admission education