जिल्हा परिषदेमार्गे बस आणण्याचा विचार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

सातारा - कऱ्हाड- कोल्हापूरकडून वाढे फाट्यावरून सातारा बस स्थानकावर एसटी जात असल्याने वाढीव दराचा प्रवाशांचा भुर्दंड वाचवण्यासाठी बॉंबे रेस्टॉरंट येथून जिल्हा परिषदमार्गे बस स्थानकावर बस नेण्याचा विचार एसटी प्रशासनात सुरू आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाची परवानगी आवश्‍यक असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात उंब्रज- मसूर- कऱ्हाड या मार्गावर, तसेच सातारा- तारळे- पाटण या मार्गावर एसटीच्या जादा गाड्या सुरू करणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक एस. एस. पळसुले यांनी दिली. 

एसटीचा वर्धापन दिन आज येथे उत्साहात साजरा केला. त्यानिमित्त विभागीय कार्यालय रांगोळ्यांनी सजून गेले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना पळसुले म्हणाले, ""राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आता शिवशाहीच्या स्लिपर कोच बस आहेत. साताऱ्यातून हैदराबाद, नांदेड, औरंगाबादसाठी या बस लवकरच सोडल्या जाणार आहेत, तसेच जिल्ह्यात काही मार्गावर पुन्हा बस सुरू करणार आहे. सध्या उंब्रज येथून मसूरला जाण्यासाठी एकही एसटी नाही. यामुळे नागरिकांना नाईलाजाने खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळावे लागते. या मार्गावर लवकरच उंब्रज- मसूर- कऱ्हाड अशी बससेवा सुरू करणार आहे. नागठाणेमार्गे सातारा- पाटण एसटीच्या गाड्याही वाढविणार आहे.'' 

या वेळी पळसुले यांनी एसटीच्या योजनांची माहिती दिली. सध्या साताऱ्यात येणाऱ्या बस वाढे फाट्यावरून आणव्या लागत असल्याने प्रवाशांना जादा तिकिटाचा भुर्दंड बसत आहे. जिल्हा परिषदमार्गे बस आणल्यानंतर पूर्वीच्याच दरात प्रवाशांना जिल्हा परिषदेपर्यंत येता येईल. साताऱ्यात येणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना कामासाठी जिल्हा परिषद, न्यायालय, बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय येथे यावे लागते, तसेच पोवई नाका परिसरातील शाळा, महाविद्यालयांना येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हे सोयीचे होणार आहे. मात्र, या मार्गासाठी पोलिस प्रशासनाच्या परवानगीची गरज आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

उंब्रज- मसूर- कऱ्हाड मार्गावर आणखी एसटी सुरू केल्यास या मार्गावरील प्रवासी व विद्यार्थ्यांना सोयीचे होईल. विद्यार्थ्यांची कऱ्हाड बस स्थानकावरील गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. पर्यायाने कऱ्हाड शहर बससेवेवरील ताणही कमी होऊ शकतो. 
- एस. एस. पळसुले, विभाग नियंत्रक, सातारा

Web Title: ST anniversary celebration in satara