नादुरुस्त गाड्या अन्‌ हताश प्रवाशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पाचगणी - मेढा आगाराच्या सहा गाड्यांचे एकूण २२ फेऱ्यांचे नियोजन पाचगणी-पाचवड मार्गावर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काही गाड्या सतत बंदावस्थेत असल्यामुळे प्रवासी हताश झाले आहेत. तास न्‌ तास प्रवासी गाडीच्या प्रतीक्षेत ताटकळत बसतात. 

पाचगणी - मेढा आगाराच्या सहा गाड्यांचे एकूण २२ फेऱ्यांचे नियोजन पाचगणी-पाचवड मार्गावर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काही गाड्या सतत बंदावस्थेत असल्यामुळे प्रवासी हताश झाले आहेत. तास न्‌ तास प्रवासी गाडीच्या प्रतीक्षेत ताटकळत बसतात. 

मेढा आगाराचे वेळापत्रक सतत कोलमडते. गाड्यांची अवस्था दयनीय झाली असून, दिवसातून किमान एक ते दोन गाड्या वाटेतच बंद पडतात, असे नियमित प्रवास करणारे सांगतात. काही दिवसांपूर्वी मेढा येथून पाचगणीकडे येणाऱ्या गाडीतून धूर निघू लागल्याने गणेश पेठ ते पाचगणी असा पायी प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली. जावळी तालुक्‍यातील अंदाजे साडेचारशे ते ५०० विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. एसटीचे वेळापत्रक सतत कोलमडलेले असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. रटाळ गाड्या व वेळापत्रक रामभरोसे असल्याने प्रवाशांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मेढा येथून पाचगणीकडे येणाऱ्या मोजक्‍याच गाड्या व त्यासुद्धा आगाराच्या सोईनुसार सुटत असल्यामुळे मेढा स्थानकावर प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. अनेकदा पाचगणी मुक्कामी येणारी गाडी येतच नाही, तर आखेगणीसारख्या दुर्गम व डोंगराळ भागात मुक्कामी गाडी जात नसल्याने प्रवाशांना त्रासास सामोरे जावे लागते.

गाड्यांच्या तांत्रिक चौकशीची मागणी
पाचगणी ते पाचवड मार्गावर दिवसभरात सकाळी सव्वासहा ते रात्री पावणेआठपर्यंत एकूण २२ फेऱ्या सोडण्याचे नियोजन आहे. प्रत्यक्षात दिवसभरात किती फेऱ्या होतात? किती बसेस रस्त्यातच नादुरुस्त होतात, याची चौकशी व्हावी. गाड्यांची अवस्था व वेळापत्रक सुधारण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे, अशी प्रवाशांची मागणी आहे.

Web Title: st bus passenger