अपुऱ्या बसमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

सातारा - जिल्ह्यात सध्या पाऊण लाखाहून अधिक विद्यार्थी दररोज एसटीने प्रवास करत आहेत. विविध तालुक्‍यांत पुरेशा प्रमाणात बसची संख्या नसल्यामुळे मिळेल त्या बसने प्रवास करण्याची धडपड विद्यार्थ्यांत असते. मंगळवारी ढेबेवाडी परिसरात विद्यार्थिनीच्या एसटीखाली चिरडून झालेल्या मृत्यूने हा प्रश्‍न अधोरेखित झाला आहे. या घटनेतून आता विद्यार्थी, एसटीचे प्रशासन आणि पालकांनी बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

सातारा - जिल्ह्यात सध्या पाऊण लाखाहून अधिक विद्यार्थी दररोज एसटीने प्रवास करत आहेत. विविध तालुक्‍यांत पुरेशा प्रमाणात बसची संख्या नसल्यामुळे मिळेल त्या बसने प्रवास करण्याची धडपड विद्यार्थ्यांत असते. मंगळवारी ढेबेवाडी परिसरात विद्यार्थिनीच्या एसटीखाली चिरडून झालेल्या मृत्यूने हा प्रश्‍न अधोरेखित झाला आहे. या घटनेतून आता विद्यार्थी, एसटीचे प्रशासन आणि पालकांनी बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

माध्यमिक, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात येतात. आता शिक्षणाच्या प्रसारामुळे विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. बहुतेक विद्यार्थी हे एसटीनेच प्रवास करतात. यासाठी एसटीने त्यांना प्रवासाची सवलत दिली आहे. मुलींनाही या प्रवासात चांगल्या सवलती असल्यामुळे नजीकच्या शहरात शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींची संख्याही लक्षणीय आहे. हे सर्व विद्यार्थी गामीण भागातील आहेत. गावात येणाऱ्या एसटीनेच त्यांना प्रवास करावा लागतो. त्याशिवाय शिक्षणही परवडत नाही, अशी अनेकांची स्थिती आहे. त्यामुळेच एसटीच्या या सवलतींचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. पाऊण लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवास सवलतीचे पास राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात दिले गेले आहेत. मात्र, त्या प्रमाणात त्यांना एसटीच्या गाड्या उपलब्ध नसतात. काही गावात दररोज सकाळी शाळा-महाविद्यालयांसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शंभर- दीडशेहून अधिक असते. मात्र, गाडी गावातून सकाळी एकच असते. अशा वेळी विद्यार्थी गाडीत अक्षरशः मेंढरासारखे भरलेले असतात. तीच तऱ्हा दुपारनंतर शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतर बस स्थानकावर असते. जिल्ह्यातील सर्वच बस स्थानकांवर हे चित्र पाहावयास मिळते.

बस प्लॅटफॉर्मवर उभी राहण्यासाठी यायला लागताच विद्यार्थी गाडीत जागा मिळावी, किमान प्रवेश मिळावा, यासाठी गाडीच्या मागे पळत असतात. काहीजण खिडकीच्या गजांना धोकादायकपणे लोंबकळतात. एसटीच्या दरवाजावर विद्यार्थ्यांची झुंबड उडते. ते इतर प्रवाशांची काळजी करत नाहीतच पण, स्वतःचीही काळजी करत नाहीत. त्यातूनच अनेकवेळा अपघात घडून येतात. काही वेळा या पळणाऱ्या विद्यार्थ्यांची चालकही काळजी घेत नाहीत. अनेकवेळा काळजी घेऊनही विद्यार्थी गाडीखाली आल्याची उदाहरणे आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी शिस्त पाळण्याची आवश्‍यकता आहे.

...अशी घेतली पाहिजे काळजी
  एसटीने पुरेशा गाड्या उपलब्ध करून द्याव्यात
  विद्यार्थ्यांनी गाडीत शिस्तीत प्रवेश करावा
  पालकांनीही आपल्या पाल्यांना याबाबत सूचना द्याव्यात

जिल्ह्यात एसटीने दिलेले विद्यार्थी प्रवास सवलत पास
अहल्याबाई होळकर योजनेतील पास - २५,७३७
दुष्काळग्रस्त योजना व इतर विद्यार्थ्यांचे पास - ४४,३३५
व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेले पास - ५,४६७
एकूण विद्यार्थी प्रवास सवलत पास - ७५,५३९

Web Title: ST Bus Student Death