लेखी परीक्षेनंतरही नियुक्‍तीचा मार्ग खडतरच

MSRTC
MSRTC

सोलापूर - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) चालक-वाहक पदाच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होणार आहे. त्यानंतर भोसरी येथील संगणकीकृत ट्रॅकवर ड्रायव्हिंग टेस्ट, वैद्यकीय चाचणी झाली की आणखी एकदा खुल्या रस्त्यावर ड्रायव्हिंग चाचणी होईल आणि त्यानंतर गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांना नियुक्‍तीपत्रे दिली जाणार आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याने यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ही परीक्षा दिलेल्या दुष्काळी भागातील उमेदवारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

राज्यात भयावह दुष्काळ पडल्याने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने चालक- वाहक अशा आठ हजार 22 रिक्‍त पदांची भरती काढली. त्यानुसार अर्ज मागविण्यात आले, लेखी परीक्षाही झाली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आणि काही दिवसांनंतर आचारसंहिता लागू झाली. या पार्श्‍वभूमीवर लेखी परीक्षा होऊन महिना झाला, तरीही ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीच झालेली नाही. त्यामुळे मुलगा एसटी खात्यात नोकरीला लागेल आणि दुष्काळात आपल्या उदरनिर्वाहाची अडचण सुटेल, ही कुटुंबीयांची अपेक्षा फोल ठरल्याची भावना व्यक्‍त होत आहे.

दुष्काळी भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी आचारसंहितेपूर्वी राज्य परिवहन महामंडळाकडून चालक- वाहक पदाची भरती सुरू करण्यात आली. आता लेखी परीक्षा झाली असून, उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यानंतर ड्रायव्हिंगच्या टेस्ट, वैद्यकीय चाचणी होईल आणि मग गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री

राज्याची स्थिती
एकूण जागा - 8,022
अर्जदार विद्यार्थी - 42,056
परीक्षा दिलेले उमेदवार - 35,526
उत्तीर्ण उमेदवार - 23,739

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com