एसटी कर्मचाऱ्यांनाही आता ऑनलाइन ड्युटी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

कऱ्हाड - कामगार संघटनांच्या नावाखाली काहीजण कामावर असतानाही दांडी मारत आहेत. त्यामुळे एसटीच्या वेळापत्रकाची घडी विस्कटून एसटींच्या फेऱ्याही रद्द होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. हा विचार करून एसटी महामंडळाने राज्यातील एसटी बसच्या बिघडत चाललेल्या वेळापत्रकाची घडी बसवण्यासाठी आता एसटी कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन ड्युटी लावण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्याद्वारे आलोकेशनद्वारेच कर्मचाऱ्यांना अन्याय न होता पारदर्शकपणे ड्युटी लागणार आहे. त्यामुळे कोणालाही आता दांडी मारता येणार नाही.

ग्रामीण भागात प्रामुख्याने  
आजही एसटी बसशिवाय पर्यायच नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे वाहतुकीची कितीही साधने असली, तरीही एसटीच्या प्रवाशांवर मोठा फरक पडलेला दिसत नाही. ही एसटी बसची चाके फिरण्यासाठी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांवरच एसटी बसचा डोलारा सुरू आहे. मात्र, अनेकदा एसटीच्या कामगार संघटनांच्या नावाखाली काहीजण कामावर असतानाही दांडी मारत असल्याचे एसटी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे एसटीच्या फेऱ्यांच्या वेळापत्रकाची घडी विस्कटत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर एसटीच्या फेऱ्यांचीही वेळ अनेकदा मागे-पुढे होते. त्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास सोसावा लागतो. त्यासंदर्भात अनेकदा तक्रारीही एसटी महामंडळाकडे झाल्या आहेत. एसटीचे वेळापत्रक कोलमडत असल्याने अनेकदा एसटी रोकोच्याही घटना घडल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून एसटी फेऱ्यांचा कारभार पारदर्शक व्हावा आणि बस फेऱ्यांच्या बिघडत चाललेल्या वेळापत्रकाची घडी बसावी, या हेतूने कर्मचाऱ्यांनाही आता ऑनलाइन ड्युटी लावण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्याद्वारे आता अधिकाऱ्यांची मनमानी संपुष्टात येऊन काही कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय बंद होणार आहे.

एसटीमध्ये आम्ही प्रवाशांना प्राधान्य देतो. त्यांच्या ये-जा करण्याची जबाबदारी आमच्याकडे असते. एसटीची सेवा अधिक चांगली व्हावी, यासाठी कर्मचाऱ्यांची ड्युटी ऑनलाइन करण्यात येणार आहेत. एसटीचा सर्व कारभारच ऑनलाइन करणार आहे. 
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री

साटेलोटे बंद होणार
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ड्युटी लावण्यासाठी अनेकदा अनेक डेपोत साटेलोटे सुरू असल्याचेही एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्याचाही विचार वरिष्ठ पातळीवर करण्यात आला आहे. ऑनलाइन ड्युटी लावण्यात येणार असल्याने आता या साटेलोट्याला चापच बसणार आहे.

Web Title: ST employees are now online duty