बेळगावात एसटी कर्मचारी अचानक संपावर ; परिक्षेसाठी विद्यार्थ्यांची लागली गैरहजेरी

विनायक जाधव
Friday, 11 December 2020

रात्री वस्तीसाठी गेलेल्या बसेस सकाळी प्रवासी घेऊन स्थानकावर दाखल झाल्या. यात बहुसंख्येने विद्यार्थीच होते. 

बेळगाव : परिवहन कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्याची मागणी करीत अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे शुक्रवारी प्रवाशांचे हाल झाले. राणी चन्नम्मा विद्यापीठाची आज परिक्षा होती. पण, बस बंदमुळे बहुतेक विद्यार्थी परिक्षेला गैरहजर ठरले. सकाळीच परिवहनच्या वाहक, चालकांनी काम बंदची घोषणा करीत मध्यवर्ती स्थानकावर ठिय्या आंदोलन छेडल्याने शहर वाहतुकीसह आंतरराज्य वाहतुकीवर देखील परिणाम जाणवला.

लॉकडाऊन शिथीलतेनंतर परिवहन महामंडळाची गाडी आता रुळावर येत आहे. प्रवासी देखील घराबाहेर पडू लागले असून दिवाळीपासून बसेसना गर्दी होऊ लागली. मात्र कोणतीच पूर्व सुचना न देता आज अचानक वाहक, चालकांनी आंदोलन छेडत बस बंद ठेवण्याची घोषणा केली. रात्री वस्तीसाठी गेलेल्या बसेस सकाळी प्रवासी घेऊन स्थानकावर दाखल झाल्या. यात बहुसंख्येने विद्यार्थीच होते. 

हेही वाचा - महाविकास आघाडी होणार का ? राजकीय वर्तुळात लागले डोळे -

आज विद्यापीठाची परिक्षा असल्याने पहिल्या बसने विद्यार्थी स्थानकावर दाखल झाले. पण, पुढे विद्यापीठाला जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बस बंद असल्याची माहिती सकाळी दहा वाजेपर्यंत कोणालाच नव्हती. त्यामुळे नियमीत बसने खेडेगावातून कामासाठी शहराकडे येणारे प्रवासी गावातील थांब्यावरच तासन् तास ताटकळत थांबले.

सध्या लग्नसमारंभाचा सिझन असल्याने शहरात लग्नसराईच्या खरेदीची धांदल असून परजिल्ह्यातून ग्राहक बेळगावात येतात. लग्नसमारंभासाठी लोक इतर ठिकाणी जात आहेत. पण, आज सर्वच लोक थांब्यावर अडकून राहिले. बस बंदमुळे आंतरराज्य सेवा खंडीत झाली. त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्राकडे बसेस धावल्या नाहीत. प्रवासी वाहतूक करण्यासाठी गोव्यातून आलेल्या कदम्बा बसेस आणि महाराष्ट्रातून आलेल्या एस. टी. महामंडळाच्या बसेसना कर्नाटक परिवहनच्या चालक आणि वाहकांनी हरकत घेतली त्यामुळे त्या बसेस कित्येक तास बेळगाव मध्यवर्ती स्थानकावरच अडकून राहिल्या.

हेही वाचा -  सगळं आहे ! फक्त पोरगी मिळाली पाहिजे ;  व्यथा तिशी ओलांडलेल्या मुलांची -

 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST employees strike on belgaum today morning travels face problem of transportation