esakal | बेळगाव : कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या महाराष्ट्र परिवहनच्या बस अडवल्या
sakal

बोलून बातमी शोधा

ST entry not allowed in belgaum kognoli check post for today

रिपोर्ट नसणाऱ्या वाहनधारकांना परत महाराष्ट्रात पाठवण्यात आले. 

बेळगाव : कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या महाराष्ट्र परिवहनच्या बस अडवल्या

sakal_logo
By
अनिल पाटील

कोगनोळी (बेळगाव) : काल महाराष्ट्रातून कर्नाटक जाणाऱ्या वाहनांना निर्बंध घातले होते. आज ही कारवाई कायम ठेवण्यात आली. दोन दिवसात हजारो वाहनांना महाराष्ट्रात परत पाठवण्यात आले आहे. या वाहनधारकांकडे आरटीपीसीआर रिपोर्टची मागणी करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांकडे आरटीपीसीआर रिपोर्ट आहे, अशा वाहनधारकांना कर्नाटकात सोडण्यात आले. रिपोर्ट नसणाऱ्या वाहनधारकांना परत महाराष्ट्रात पाठवण्यात आले. 

येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणार्‍या वाहनांना निर्बंध घालण्यात आले. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या महाराष्ट्र महामंडळाच्या बसना आज अडवण्यात आले. कर्नाटकातील सीमावर्ती भागात असणाऱ्या निपाणी संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, उत्तूर या गावातून जाणाऱ्या बसेस सुरू ठेवण्यात आल्या आहेत. कर्नाटकातील बेळगावसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व महाराष्ट्र बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - बेळगावात भाषिक अल्पसंख्याक शाळांना दिलासा ; रोष्टरचे संकट लवकरच होणार दुर -

कालपासुन सुरु असलेल्या कार्यवाहीमुळे चारचाकी वाहानधारकांची तारंबळा उडली. अचानक प्रवेश बंद झाल्याने प्रवाशांना काय करावे हा प्रश्न पडला. अनेकांना विवाहासह अन्य शुभकार्याला हजर राहता आले नाही. तर सध्या शाळा कॉलेज सुरु असल्याने प्रवेश घेण्यासाठी निघालेल्या विद्यार्थी व पालकांना ही परत जावे लागले. दोन दिवसात सुमारे अठराशे लोकांनी आपले आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवून कर्नाटकात प्रवेश घेतला आहे.

तसेच सीमा भागालगतच्या गावात असणाऱ्या वाहनधारकांना आधारकार्ड दाखवून प्रवेश दिला जात आहे. याठिकाणी डीवायएसपी मनोजकुमार नाईक, मंडल पोलिस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार, उपनिरीक्षक अनिता राठोड यांच्या सह अन्य पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने चिकोडी वैद्यकीय अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, निपाणी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, मदतनीस, अशा सेविका या ठिकाणी तैनात करण्यात आले.

संपादन - स्नेहल कदम