एसटीचा आदेश ठरतोय वाहकांना डोकेदुखी

शिवाजी यादव
रविवार, 18 डिसेंबर 2016

कोल्हापूर - विविध गावांकडे धावणाऱ्या एसटी बस फलाटावर लागताना दिसताच एसटीच्या मागे धावत खिडकीतून रुमाल टाकणे, वर्तमानपत्र टाकणे किंवा टोपी, पाण्याची बाटली अशा काही वस्तू टाकून जागा पकडण्याचे प्रकार सर्रास घडतात. यावर एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने वाहकांनी गाडी फलाटावर लागण्यापूर्वी गाडीतील सर्व खिडक्‍यांच्या काचा बंद कराव्यात, असे आदेश काढले आहेत. 

कोल्हापूर - विविध गावांकडे धावणाऱ्या एसटी बस फलाटावर लागताना दिसताच एसटीच्या मागे धावत खिडकीतून रुमाल टाकणे, वर्तमानपत्र टाकणे किंवा टोपी, पाण्याची बाटली अशा काही वस्तू टाकून जागा पकडण्याचे प्रकार सर्रास घडतात. यावर एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने वाहकांनी गाडी फलाटावर लागण्यापूर्वी गाडीतील सर्व खिडक्‍यांच्या काचा बंद कराव्यात, असे आदेश काढले आहेत. 

राज्यातील कोणत्याही बसस्थानकावर रोज शेकडो बस व हजारो प्रवाशांची गर्दी असते, तर एसटी बस फलाटावर थांबविण्यासाठी डेपोतून बाहेर पडली की जागा मिळविण्यासाठी प्रवासी बससोबत धावतात. खिडकीतून काही तरी वस्तू बाकावर टाकतात. ज्येष्ठ नागरिक, महिला व अन्य प्रवासी गाडी फलाटावर आल्यानंतर रांगेतून आत जातात. वस्तू ठेवून जागा पकडल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्‌भवतात. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक विभागाने हा आदेश काढला आहे. आदेश योग्य असला तरी तो वाहकांसाठी डोकेदुखी ठरणारा आहे. या आदेशानुसार खिडकीच्या काचा वाहकांनी बंद कराव्यात म्हटले आहे. 

पहिल्यांदा गाडी प्रवासाला निघताना डेपोतून फलाटावर आणतात, तेव्हा काचा नक्की बंद करता येतील. कारण तेव्हा गाडीत फक्त वाहक-चालक असतो. गाडी पहिल्या थांब्यावरून सुटल्यानंतर दहाव्या थांब्याला जाईपर्यंत मधल्या गावातील बसस्थानकावर जाते, तेव्हा खिडकीतून वस्तू टाकण्याचे प्रकार घडतात. तेव्हा गाडीत प्रवासी भरलेले असतात. वाहकांनी तिकीट द्यावे की खिडक्‍या बंद करून घ्याव्यात तसेच गाडी बसस्थानकावर येण्यापूर्वी गाडी सुरू असताना प्रत्येक जागेवर जाऊन वाहकाने बंद करणे धोकादायक ठरू शकते. अशात एक लांबच्या प्रवासात चार पाच वेळी करावे लागणे आहे अशक्‍य आहे.

नव्या आदेशानुसार काचा बंदच्या कसरती वाहकांना करायला लावण्यापेक्षा कोणतेही वस्तू खिडकीतून टाकून जागा आरक्षित करता येणार नाही, ती ग्राह्य मानली जाणार नाही, असे आदेश काढून वाहकांना दिल्यास, कोणीही वस्तू टाकून जागा पकडलीच तर त्याला नियमानुसार वाहक उठवू शकेल. 
जो प्रवासी रांगेतून आला, त्याला बसायला जागा वाहक देऊ शकेल. आदेश चांगला असला तरी अपुरा असल्याने तो सुधारित करण्याची गरज आहे.  

कायद्यासाठी चाचपणी करण्याची गरज
एसटी गाडी फलाटावर लागताना गाडी धावत असते. वळत असते. तिच्या मागे धावत खिडकीतून काही जण वस्तू टाकून जागा पकडतात. हा प्रकारच जिवावर बेतणारा, इतरांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे खिडक्‍यांतून वस्तू टाकून जागा पकडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करता येते का? याची चाचपणी वाहतूक विभागाने करणे गरजेचे आहे, असे मत वाहकांतून व्यक्त होत आहे.

Web Title: st order problem to driver