स्टार प्रचारक अडकले मतदारसंघांत! 

संजय साळुंखे- सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. प्रचार शिगेला पोचला आहे. मात्र, या प्रचारात पक्षातील स्टार प्रचारक दिसत नाहीत. कुरघोडीचे राजकारण, तालुक्‍यात विरोधकांकडून मिळालेले आव्हान व मातब्बर उमेदवारांमुळे बहुतांश स्टार प्रचारक हे आपल्या मतदारसंघातील प्रचारातच अडकल्याचे दिसून येते. 

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. प्रचार शिगेला पोचला आहे. मात्र, या प्रचारात पक्षातील स्टार प्रचारक दिसत नाहीत. कुरघोडीचे राजकारण, तालुक्‍यात विरोधकांकडून मिळालेले आव्हान व मातब्बर उमेदवारांमुळे बहुतांश स्टार प्रचारक हे आपल्या मतदारसंघातील प्रचारातच अडकल्याचे दिसून येते. 

निवडणूक म्हटले की प्रचार येतोच. प्रचारात आरोप-प्रत्यारोपही होतात. अशा पद्धतीने झालेल्या प्रचाराची चर्चाही चांगली रंगते. त्यामुळे शेलक्‍या शब्दात बोलणाऱ्या, टोकदार भाषण करणाऱ्या नेत्यांना नेहमीच प्रचारात सहभागी होण्यासाठी मागणी असते. जिल्ह्यातही प्रत्येक पक्षात स्टार प्रचारक आहेत. मात्र, सध्याची राजकीय स्थिती वेगळी आहे. त्यामुळे हे स्टार प्रचारक अन्य तालुक्‍यांत जाऊन भाषणबाजी करण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघातच अडकून पडल्याचे दिसतात. खासदार उदयनराजे भोसले यांना प्रचारासाठी सर्वाधिक पसंती आहे. मात्र, राष्ट्रवादीने काडीमोड घेतल्याने उदयनराजेंचेही राजकीय गणित विस्कटले आहे. सातारा जिल्हा सोडा; सातारा विकास आघाडीच्या उमेदवारांसाठीही त्यांनी सातारा तालुक्‍यातही अद्याप जाहीर सभा, पदयात्रा घेतलेली नाही. राष्ट्रवादीतून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे व शेखर गोरे यांना मागणी आहे. फलटणची धुरा संजीवराजे संभाळत असल्याने रामराजे हे लवकरच अन्य तालुक्‍यांत सभा घेण्याची शक्‍यता आहे. कोरेगावात कॉंग्रेस व खटावमध्ये महेश शिंदे यांनी आव्हान दिल्याने, तसेच बंधू ऋषिकांत यांच्यासाठी प्रचार करावा लागत असल्याने शशिकांत शिंदेही अन्य ठिकाणी प्रचारासाठी वेळ देऊ शकत नसल्याची स्थिती आहे. शेखर गोरेंनी माण व खटाव तालुक्‍यांवरच लक्ष केंद्रित केले आहे. कॉंग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आमदार जयकुमार गोरे यांना प्रचारासाठी पसंती आहे. मात्र, हे दोघेही स्थानिक आव्हांनामुळे मतदारसंघातच व्यस्त दिसतात. त्यातही रामराजेंशी असलेले वैर लक्षात घेता जयकुमार गोरे हे फलटण तालुक्‍यात सभा घेण्याची शक्‍यता आहे. भाजपमध्ये स्टार प्रचारकांची संख्या कमी आहे. आक्रमक शैली असलेल्या डॉ. दिलीप येळगावकरांनी खटाव, माणमध्येच जास्त लक्ष दिले आहे. दीपक पवार यांना गटातच आव्हान असल्याने ते अन्यत्र प्रचार करू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे. 

शिवसेनेतून उपनेते नितीन बानुगडे-पाटील व आमदार शंभूराज देसाईंना कार्यकर्त्यांकडून मागणी आहे. सध्या बानुगडे-पाटील हे जिल्ह्यापेक्षा अन्य जिल्ह्यांतच प्रचारात व्यस्त आहेत. तब्येतीमुळे देसाई यांनाही प्रचार करण्यावर मर्यादा आहेत. 

 

प्रचारासाठी उरले फक्त तीन दिवस 
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. जाहीर सभा, पदयात्रा, कोपरासभा, घरभेटी आदींच्या माध्यमातून उमेदवारांचा मतदारांशी संपर्क सुरू आहे. त्याशिवाय ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातूनही वातावरण निर्मिती केली जात आहे. रविवारी (ता. 19) मध्यरात्री 12 वाजता जाहीर प्रचार संपेल. त्यामुळे उमेदवारांना फक्त तीनच दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांकडूनच दिवस-रात्र प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. 

Web Title: Star campaigner stuck constituency