महापालिकेसाठी भडकणार ‘स्टार वॉर’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

मुख्यमंत्र्यांसह अख्खे मंत्रिमंडळच प्रचारात

मुख्यमंत्र्यांसह अख्खे मंत्रिमंडळच प्रचारात

भारतीय जनता पक्ष - केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने फुल्ल फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षातील दिग्गज नेत्यांना प्रचार मैदानात उतरवण्याचे निश्‍चित केले आहे. यामध्ये सर्वाधिक आकर्षणाचे केंद्रबिंदू असणार आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांच्या बरोबरच केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांच्यासह महाराष्ट्रातील बहुतांश कॅबिनेट व राज्यमंत्री प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.

पक्षाचे स्टार प्रचारक विरोधकांवर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावाच मोठ्याप्रमाणावर सादर करण्यावर भर देण्याची शक्‍यता पक्ष सूत्रांनी आज ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

स्टार मुद्दे...
५० वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसचा नाकर्तेपणा
सोलापूरला आलेला बकालपणा
महापालिकेतील भ्रष्टाचार 
राज्यात व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला महापालिकेतही सत्ता देऊन विकासाची संधी साधण्याचे आवाहन

उद्धव, आदित्य ठाकरेंसह सोलापूरचे डॉ. शेटे

शिवसेना - राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमध्ये शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
शिवसेनेची भारतीय जनता पक्षासमवेतची युती तुटल्यामुळे शिवसेनेला यशासाठी संपूर्ण महाराष्ट्र एकट्याने पिंजून काढावा लागणार आहे. राज्यभरात विविध ठिकाणी सभा घेण्यासाठी शिवसेनेने स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन कीर्तिकर, अनंत गीते, अनिल देसाई, अरविंद सावंत, अनंत तरे, रवींद्र मिर्लेकर, आनंदराव अडसूळ, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत खैरे, आदेश बांदेकर, विनायक राऊत, डॉ. अमोल कोल्हे, नितीन बानगुडे-पाटील, एकनाथ शिंदे, डॉ. दीपक सावंत, संजय राठोड, विजय शिवतारे, दीपक केसरकर, रवींद्र वायकर, दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, विश्‍वनाथ नेरुरकर, लक्ष्मण वडळे, अराफत शेख, शरद पोंक्षे, सुनील प्रभू, राहुल शेवाळे, भावना गवळी, विशाखा राऊत, मीना कांबळी यांचा समावेश आहे.

स्टार मुद्दे...
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार
शहरातील असुविधा
कर भरूनही सोयींचा अभाव
सोलापूर महापालिकेचा विकास
विकास आराखडा
स्वच्छ आणि एक दिवसाआड पाणी

Web Title: star war in solapune municipal election