करवसुलीत सातारा पालिका उत्तीर्ण!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

संचालकांनी कान उपटल्याने ८१ टक्के गुण; ६५ मिळकतींना सील 
सातारा - सहायक संचालकांनी कान उपटल्यामुळे ३१ मार्चअखेर ८१ टक्के गुण मिळवून सातारा पालिका उत्तीर्ण झाली. एकूण मागणी २३ कोटी रुपये असताना १८ कोटी ६७ लाख रुपये कर रूपात पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. हा कर वसूल करताना काही फ्लॅटसह ६५ मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या, तर तब्बल १६४ कुटुंबांची नळ कनेक्‍शन तोडण्यात आली. 

संचालकांनी कान उपटल्याने ८१ टक्के गुण; ६५ मिळकतींना सील 
सातारा - सहायक संचालकांनी कान उपटल्यामुळे ३१ मार्चअखेर ८१ टक्के गुण मिळवून सातारा पालिका उत्तीर्ण झाली. एकूण मागणी २३ कोटी रुपये असताना १८ कोटी ६७ लाख रुपये कर रूपात पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. हा कर वसूल करताना काही फ्लॅटसह ६५ मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या, तर तब्बल १६४ कुटुंबांची नळ कनेक्‍शन तोडण्यात आली. 

पाणीपट्टी व मिळकत करापोटी सुमारे २३ कोटी रुपये वसूल करण्याचे पालिका प्रशासनापुढे उद्दिष्ट होते. ३१ मार्चअखेर ही वसुली न केल्यास पालिकेला शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदानांवर परिणाम होऊ शकतो. परिणामी शहरातील विकासकामांवर त्याचा दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे वसुलीचा टक्का वाढविण्यासाठी पालिकेच्या वसुली विभागाने धडक विशेष वसुली मोहीम राबविली. मोहिमेच्या नावात असलेला धडकपणा प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर अभावानेच  आढळून आला. परिणामी मार्च महिन्यांच्या मध्यावर सातारा पालिका ५५ टक्‍क्‍यांच्या आसपास घुटमळत होती. 

नगरपालिका प्रशासनाचे सहायक संचालक संजय गायकवाड यांनी साताऱ्यात घेतलेल्या बैठकीत असमाधानकारक वसुली असलेल्या सातारा पालिकेसह जिल्ह्यातील इतर काही नगरपंचायतींचे कान पिळले होते. त्यानंतर सातारा पालिकेच्या वसुली विभागाने धडक मोहीम सुरू केली. त्यामध्ये त्यांनी २५ हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या निवडक थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रांतून जाहीर केली. काही मोबाईल टॉवरचे भाडे थकले होते. असे पाच टॉवर सिल करण्यात आले. दुसऱ्या बाजूस थकबाकीदारांच्या मालमत्ता सिल करून ताब्यात घेण्याचा धडाका सुरूच होता. 

पालिकेचे वसुली विभागाचे सहायक कर निरीक्षक अंबादास वणवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘३१ मार्च अखेर २३ कोटींच्या उद्दिष्टापैकी १८ कोटी ७६ लाख रुपयांची वसुली करत असताना वसूल कर्मचाऱ्यांनी थकबाकीदारांच्या ६५ मालमत्ता ताब्यात घेतल्या. एकूण १६४ थकबाकीदारांची नळकनेक्‍शन कट करण्यात आली. या थकबाकीदारांनी अद्यापि थकबाकी न भरल्यास त्यांचा पाणीपुरवठा कायमचा बंद करण्यात येईल.’’ 

दिवसभरात ८७ लाखांची वसुली 
वसुली मोहिमेत पालिकेचे ४२ कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून काम करत आहेत. त्यांनी या काळात शनिवार- रविवार या सुट्याही घेतल्या नाहीत. काल (३१ मार्च) दिवसभरात या कर्मचाऱ्यांनी विक्रमी ८७ लाख रुपयांची वसुली केली. 

Web Title: stara district pass in tax recovery