राज्य बास्केटबॉल स्पर्धेत नागपूर व धुळे संघास साताऱ्याचे आव्हान!

सिद्धार्थ लाटकर 
मंगळवार, 5 जून 2018

सातारा : बास्केटबॉलची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील मुलांच्या संघाने अनेक वर्षानंतर राज्य अजिंक्‍यपद युवा गटाच्या बास्केटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. या संघाची लढत नागपूर बरोबर होत आहे. तसेच मुलींच्या गटात धुळे संघास संभाव्य विजेते म्हणून चर्चेत असलेल्या सातारा संघाचा उपांत्य फेरीत सामना करावा लागणार आहे. 

रणजित अकादमी व सातारा पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत आज (मंगळवार) यजमान साताऱ्याच्या मुलांच्या व मुलींच्या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीचे सामन्यांत मुलांच्या गटात सातारा संघाने मुंबई साऊथ वेस्ट संघास 76-54 असे तब्बल 22 गुणांनी हरविले. साताऱ्याकडून दीप अवकिरकरने 31, यश राजेमहाडिकने 20 गुण नोंदविले. मुलींच्या गटात सातारा संघाने ठाणे संघाचा 66-54 असा पराभव केला. साताऱ्याच्या श्रुती भोसलेने 23, चैतन्या राजेने 14 गुण नोंदविले. त्यांना अविशा गुरवची उत्तम साथ लाभली. ठाण्याच्या मेलडी मेंझेसने 18, ऋतुजा चौधरीने 12 गुण नोंदविले. 
दरम्यान (सोमवारी) सायंकाळच्या सत्रात साताऱ्याच्या मुलांच्या संघाने सोलापूर संघावर 61-50 अशी मात केली. साताऱ्याच्या यश राजेमहाडिकने 18, तेजराज मांढरेने 13 गुण नोंदवित विजयात म्हत्त्वपूर्ण वाटा उचलला. त्यांना विवेक बडेकर, राज पाटील यांची साथ लाभली. साताऱ्याच्या मुलींच्या संघानेही मुंबई उत्तर संघाचा 68-48 असा 20 गुणांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. साताऱ्याकडून श्रुती भोसलेने 27, चैतन्या राजेने नऊ गुण, मुंबईच्या सुझान पिंटोने 30 गुण, तसेच वैभवी तावडेने सात गुण नोंदविले. 

उपांत्य फेरी 
१) मुली - सातारा विरुद्ध धुळे (सायंकाळी सहा वाजता)
२) मुले - सातारा विरुध्द नागपूर (रात्री आठ वाजता)
स्थळ - गुरुवार पेठेतील श्रीमंत छत्रपती संभाजीमहाराज क्रीडा संकुल, सातारा.

Web Title: state football match dhule and nagpur vs satara