CM Eknath Shinde : आमचे सरकार घरात बसून काम करणारे नसून शेतकऱ्यांच्या बांधावर व सामान्य शेतकरी कष्टकऱ्यांच्या पर्यंत पोहोचणारे

आमच्या सरकारने महिला सक्षमीकरणासाठी नुसत्या गप्पा मारल्या नाहीत, तर बचत गटांचे खेळते भांडवल १५ हजार रुपयावरुन २० हजार केले आहे.
Eknath Shinde
Eknath Shindesakal

इस्लामपूर (जिल्हा सांगली) - आमच्या सरकारने महिला सक्षमीकरणासाठी नुसत्या गप्पा मारल्या नाहीत, तर बचत गटांचे खेळते भांडवल १५ हजार रुपयावरुन २० हजार केले आहे. गटांच्या उत्पादनाचे ब्रँडिंग करण्यासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, याबरोबरच नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये तात्काळ खात्यात जमा होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

आमचे सरकार घरात बसून काम करणारे नसून शेतकऱ्यांच्या बांधावर व सामान्य शेतकरी कष्टकऱ्यांच्या पर्यंत पोहोचणारे आहे. विरोधकांच्याकडे शिव्या शाप देण्यापलीकडे काहीही काम उरलेले नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. इस्लामपूर (ता. वाळवा) येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते.

पालकमंत्री सुरेश खाडे, उपसभापती नीलम गोऱ्हे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, माजी मंत्री सदाभाऊ खोत, अण्णासाहेब डांगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, शिराळा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सम्राट महाडिक, सुहास बाबर, सत्यजित देशमुख, कपिल ओसवाल, जिल्हाधिकारी दयानिधी मारन, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, आयुक्त सुनील पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक घुगे प्रमुख उपस्थित होते. कॉफी टेबल बुक आणि कृष्णामृत पुस्तकाचे प्रकाशन झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'सांगली जिल्हा म्हटले की स्वातंत्र्य चळवळीची आठवण होते. प्रतिसरकारने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. अनेक मोठी माणसे या मातीने घडवली आहेत. कोल्हापूर व इस्लामपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण आमच्या लोकाभिमुख सरकारवर विश्वास दाखवलाय. जिल्ह्यात ३५ लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

शासन आपल्या दारी योजनेत साडे चार कोटी लोकांना लाभ मिळाला आहे. यापूर्वी योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक त्रास सहन करावे लागत होते. त्यामुळे लाभार्थी योजनेचा फायदा न घेता नाद सोडून देत होते. आमचे सरकार गरीब, कष्टकरी, वारकरी आणि प्रत्येक घटकांचे आहे आणि यांनाच जर नीट लाभ मिळत नसेल तर या योजनांचा उपयोग काय? म्हणून या सर्वच योजनांना आमच्या सरकारने गती दिली आहे.

लाभार्थी व्यासपीठावर बसून योजनेचा लाभ घेतात हे यापूर्वी घडले नव्हते, जे आज इथे दिसते आहे. आमचे सरकार घरात बसून काम करीत नाही, तर लोकांच्या घरात जाऊन मदत करते हा या शासन आपल्या दारी योजनेचा अर्थ आहे. कोविडकाळात फेसबुक लाईव्ह झाले ठीक आहे, पण आमचं सरकार आता लोकांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेत आहे. त्या सोडवत आहे.

देशात कामाच्या पातळीवर पुरस्कार द्यायचे ठरवले तर आमचे सरकार देशात पहिल्या क्रमांकावर राहील. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा पहिला निर्णय मी व देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. सिंचनाचे १२० प्रकल्प मार्गी लावले. १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. नियमित कर्ज परतफेडबाबतीत मागच्या सरकारने निर्णय घेतला, पण अंमलबजावणी केली नाही, आम्ही ती तात्काळ करू.

जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी याची नोंद घ्यावी. आम्ही पोकळ घोषणा करत नाही, जे बोलतो ते करून दाखवतो. एक रुपयात पीक विमा योजना देणारे आपले पहिले राज्य आहे. सरकार महिला सक्षमीकरण करत आहे. मुलींच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला.

अधिकाऱ्यांनी बचत गटाला त्याच्या वस्तूसाठी बाजारपेठ मिळावी, यासाठी स्टॉल उपलब्ध करुन द्यावेत. आरोग्य विभागाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे विरोधकांकडे आमच्यावर आरोप व शिव्याशाप देण्यापलीकडे काही राहिले नाही. आम्ही त्यांना आमच्या कामातून उत्तर देणार आणि त्यांना त्यांची जागा दाखवणार.

बाळासाहेबांचे विचार, आचार आणि भूमिका घेऊन आम्ही सरकार स्थापन केले. जे निर्णय घेतले ते सगळे निर्णय राज्यातील जनतेच्या भल्यासाठी घेतले. याआधी राज्यात काही उद्योग आले की यात माझे काय? असे विचारले जात होते. त्यामुळे उद्योगपतींनी पाठ फिरवली. सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये काय?

एखादा सामान्य माणूस मुख्यमंत्री होतो तेव्हा तो लोकांचे प्रश्न ऐकून घेतो. संपूर्ण महाराष्ट्र माझे कुटुंब आहे असे समजून मी काम करीत आहे. या बरोबरच मुख्यमंत्री म्हणजे सीएम असे न मानता मी काॅमन मॅन म्हणून काम करतो, हीच विरोधकांची पोटदुखी आहे, त्यांना पोटशूळ उठल्यानेच ते आरोप करत आहेत.आमचे लोकाभिमुख सरकार सर्व घटकांना न्याय देणारे सरकार आहे."

ते म्हणाले, 'नरेंद्र मोदी यांनी गेल्या ७० वर्षात झाले नाही, ते काम १० वर्षात केले. अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. अनेक योजना दिल्या. त्यामुळे आज आपल्या देशाचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांनी २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर काढले. ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. हे देणारे सरकार आहे, घेणारे नाही.

घोटाळेबाज सरकारला बाजूला करून मोदींनी देशात चांगले काम केले आणि राज्यातील डबल इंजिन सरकारही लोकांचा डबल फायदा व्हावा यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. दावोसला जाऊन ५ लाख कोटीचे औद्योगिक करार केले.

आम्ही उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब न ठेवता त्यांना विश्वास दिला. त्यामुळे आपल्या राज्यात उद्योगांची संख्या वाढली आहे. त्यातून येत्या काळात ३ लाख कोटी लोकांना रोजगार मिळणार आहे. खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या कामाची पोचपावती त्यांना द्याल असा विश्वास आहे.'

खासदार धैर्यशील माने म्हणाले, 'मुख्यमंत्री सामान्य माणसाला मागेल ते देत आहेत. मुख्यमंत्री आपल्या दारी येतात, सामान्यांच्या घरापर्यंत जाऊन सर्वांच्या प्रश्नांना दिलासा देण्याचे आणि वाचा फोडण्याचे काम करत आहेत. सांगली जिल्हा लढवय्या लोकांचा आहे. इथल्या मातीला क्रांतीचा वसा आहे. आजवर असे कधीच घडले नव्हते की अधिकारी लोकांच्या दारात जाऊन योजनांचा लाभ मिळवून देतायत.

शिवछत्रपतींच्या स्वप्नातील संकल्पना या सरकारकडून राबवली जात आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीचा जो अध्यादेश काढला आहे त्याचे पैसे मिळावेत, महिला बचतगट तळागाळात जाऊन काम करतायत, त्यांची मागणी विचारात घ्यावी. त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी त्यांना सरकारने मदत करावी.' पालकमंत्री सुरेश खाडे यांनी प्रास्ताविक केले.

धरणग्रस्तांना न्याय देऊ

खासदार माने आणि गौरव नायकवडी यांनी वारणा धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. त्यावर तात्काळ बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यासपीठावरुन दिले.

राष्ट्रवादीचे नेते अण्णासाहेब डांगे व्यासपीठावर!

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना जयंत पाटील यांचे इस्लामपूर मतदारसंघातील समर्थक सहकारी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी अचानक व्यासपीठावर हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पाठीमागे कोल्हापूर येथे झालेल्या उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या सभेतही श्री. डांगे यांनी अशीच उपस्थिती लावली होती. डांगे यांचे दोन्ही सुपुत्र जयंत पाटील गटात आजअखेर कार्यरत आहेत. मात्र डांगे हे या सरकार बरोबरच असल्याचे त्यांच्या उपस्थितीतून जाणवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com