राज्य सरकारने श्‍वेतपत्रिका काढावी - डॉ. भारत पाटणकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

सातारा - मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांबाबत विविध मंत्र्यांना शासनाचे प्रतिनिधी म्हणून पाठवून जिल्ह्यातील विविध कार्यकर्त्यांशी बोलण्याची सुरू केलेली प्रक्रिया ही लोकशाहीविरोधी आणि वेळकाढूपणाची आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आणि ऍट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्तीबाबत राज्य सरकारने श्‍वेतपत्रिका काढावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली आहे.

सातारा - मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांबाबत विविध मंत्र्यांना शासनाचे प्रतिनिधी म्हणून पाठवून जिल्ह्यातील विविध कार्यकर्त्यांशी बोलण्याची सुरू केलेली प्रक्रिया ही लोकशाहीविरोधी आणि वेळकाढूपणाची आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आणि ऍट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्तीबाबत राज्य सरकारने श्‍वेतपत्रिका काढावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली आहे.

संपूर्ण मराठा समाजाच्या या प्रक्रियेत कोणीही नेतृत्व करीत नाही. सरकारच्या प्रतिनिधींशी बोलायला मराठा समाजाने कोणालाही अधिकार दिलेले नाहीत. ही चर्चा घडविणे म्हणजे या समाजाने घेतलेल्या निर्णयाला खो घालण्याचा प्रकार आहे, असे सांगून डॉ. पाटणकर म्हणाले, ""समाजाने लेखी मागण्या सरकारकडे दिल्या आहेत. त्याबद्दलचा लेखी प्रस्ताव तयार करून तो प्रसारित करावा, अन्यथा सरकारने श्‍वेतपत्रिका काढावी. त्यावर मराठा समाज लोकशाही मार्गाने प्रतिक्रिया देईल.''

उपकार केले नाहीत
ईबीसी सवलतीसंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल मराठा समाजाने सरकारचे आभार मानले पाहिजेत, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ही त्यांची भूमिका चुकीची असून या विधानाबद्दल श्री. पाटील यांनी समाजाची माफी मागावी. कारण लाखोंच्या संख्येने समाज राज्यभर रस्त्यावर आल्यानंतर सरकारने हा एकतर्फी निर्णय घेतला आहे. या निर्णयाने सकल मराठा समाजावर उपकार केलेले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी
नाशिक येथे झालेल्या जाळपोळ, अत्याचार प्रकरणात परिस्थिती चिघळविणाऱ्यांमध्ये भाजपचे कार्यकर्ते सापडले आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागून संबंधितांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यास पक्षाला भाग पाडायला हवे, अशी मागणी डॉ. पाटणकर यांनी केली.

शंभूराजेंनी आत्मपरीक्षण करावे
पाटण येथील घटनेबाबत महाराष्ट्र साहित्य परिषदेची बोटचेपी होते. भाषण न ऐकलेल्यांनी केवळ राजकारणासाठी लढाऊ वृत्ती दाखविणे योग्य नाही. आमदार होण्यासाठी शंभूराजेंनी शिवसेनेचा पर्याय निवडला. दुसरा कोणी आमदार करणार असते तर ते तिकडे गेले नसते. पाटणमधील प्रकारात त्यांनी हस्तक्षेप करायला नको होता. व्यंगचित्रातून भावना दुखावल्याने काही शिवसेना आमदारांनी राजीनामे दिले. त्यावेळी तुमचा स्वाभिमान कुठे गेला होता. त्यामुळे शंभूराजेंनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला डॉ. पाटणकर यांनी दिला.

धार्मिक हुकूमशाहीकडे वाटचाल
मुख्यमंत्री नुकतेच नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून तेथे भाषणही केले. मुख्यमंत्र्यांचे तेथील वक्तव्य हे सर्व तत्त्वांना झुगारून देणारे असून या बाबींवर त्यांनी राजीनामा देणे हाच उपाय आहे. धार्मिक हुकूमशाही आणण्याकडे ही वाटचाल असून लोकशाही आणि घटनेचा अवमान करणारे हे विधान आहे. त्यामुळे हे विधान त्यांनी मागे घेऊन जनतेची माफी मागावी.

...तर जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार
मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांबाबत जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत काहीही निर्णय राज्य शासनाने घेतला नाही, तर या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याच्या तयारीत मराठा क्रांतीचे काही ग्रुप आहेत. त्यासाठी गावपातळीपासूनच वातावरण निर्मिती होत आहे. या निवडणुकीत आम्ही "नोटा'ही वापरू शकतो, याकडेही शासनाने लक्ष द्यावे, असेही डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: State government toward white paper