एसटीची "आपत्ती'त असंवेदनशीलता; आपत्ती व्यवस्थापनकडेही नव्हते "अपडेट' 

दिलीपकुमार चिंचकर
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

सर्वत्र माणुसकीच्या भावनेतून मदतीचा पूर वाहत असताना सातारा विभाग नियंत्रक कार्यालयाने मात्र संवेदनशीलता दाखविली नाही, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. 

सातारा : अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण होताच राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जिल्ह्याच्या विविध भागांतील एस बस बंद ठेवल्या. प्रवाशांची जीवितहानी होऊ नये यासाठी घेतलेला निर्णय योग्य असला तरी त्यासंदर्भात सातारा विभाग नियंत्रकांसह एसटीच्या एकाही अधिकाऱ्याने याची माहिती नागरिकांपर्यंत पोचवली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागले. विशेष म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कक्षासदेखील एसटीच्या दळणवळणाबाबतचे "अपडेट' प्राप्त होत नव्हते, ही शोकांतिकाच आहे. 

गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीने सारेजणच बेजार झाले. जिल्ह्यात विशेषतः पाटण आणि कऱ्हाड तालुक्‍यांना पुराचा जास्त फटका बसला. पूरपरिस्थितीने पाटण बस स्थानकावर पाणी साचले होते. तेथून गाड्या बाहेर पडणे शक्‍यच नव्हते. पाटण आगाराच्या काही गाड्या उंब्रजसारख्या सुरक्षित ठिकाणी अडकलेल्या होत्या. त्या गाड्या तालुक्‍यातील तारळे, चाफळ विभागात पाठविण्यात कोणताच धोका नव्हता, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. बसची सेवा बंद ठेवल्यामुळे पुणे, मुंबईहून येणाऱ्यांना बससेवा बंद आहे, याची कल्पना नव्हती. उंब्रज बस स्थानकावर दररोज विविध भागातील प्रवाशांना उंब्रज वाहतूक नियंत्रकांकडून एकच वाक्‍य ऐकावे लागत होते "आम्हाला वरिष्ठांचा आदेश आहे, गाड्या सोडता येणार नाहीत.' गाड्या, चालक, वाहक उपलब्ध असूनही प्रवाशांची सोय केली गेली नाही. "सकाळ'ने पाटण आगाराचे अधिकारी तसेच सातारा विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन्ही अधिकाऱ्यांचे मोबाईल लागतच नव्हते तर विभाग नियंत्रकांच्या कार्यालयातील दूरध्वनी ऑपरेटर बिझी असल्याचे सांगत. हाच अनुभव आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनादेखील आला. परंतु, पूरपरिस्थितीच्या लोकांच्या रेस्क्‍यू आणि रिलीफ ऑपरेशनमध्ये व्यस्त असलेल्यांना सध्या तरी त्याकडे कानाडोळा केला आहे. पूरग्रस्तांसाठी सर्वत्र माणुसकीच्या भावनेतून मदतीचा पूर वाहत असताना सातारा विभाग नियंत्रक कार्यालयाने मात्र संवेदनशीलता दाखविली नाही, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State transport service Insensitivity in disaster