पर्यटकांची पावले चांदोलीकडे... 

शिवाजीराव चौगुले
Sunday, 7 March 2021

चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांचा ओघ वाढू लागला असून, चार महिन्यांत फेब्रुवारी अखेरपर्यंत 5061 पर्यटकांनी भेट दिली आहे.

शिराळा (जि. सांगली) : चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांचा ओघ वाढू लागला असून, चार महिन्यांत फेब्रुवारी अखेरपर्यंत 5061 पर्यटकांनी भेट दिली आहे. सध्या शिराळा तालुक्‍यातील झोळंबी येथे 21 किलोमीटर जंगल सफारी सुरू आहे. आता शाहूवाडी तालुक्‍यातील उखळूपासून उदगिरीपर्यंत 20 किलोमीटरची ही जंगल सफारी सुरू करण्यात आली असल्याने मणदूरप्रमाणे उखळू येथील स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. सफारीसाठी 16 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिराळा तालुक्‍याचा पश्‍चिम भाग हा चांदोली राष्ट्रीय उद्यान, चांदोली धरण, वसंत सागर जलाशय व पठारावर असणाऱ्या पवनचक्‍क्‍या, पावसाळ्यात कोसळणारे धबधबे यामुळे पर्यटकांना आकर्षित करतो. निसर्गाची ही मुक्तहस्त उधळण ही आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अनेकजण आतूर असतात. चांदोलीत प्रवेश केल्यानंतर मणदूर ते खुंदलापूर हा नागमोडी वळणाचा घाट रस्ता व त्याच्या आजूबाजूला असणारी हिरवीगर्द वनराई पर्यटकांना आकर्षित केल्याशिवाय रहात नाही. उद्यानात गेल्यानंतर पर्यटकांना गवे, सांबर, रानडुक्कर, माकडे, वानर, विविध प्रकारची फुलपाखरे विविध झाडे, फुले, वनस्पती पाहवयास मिळतात. 

वारणावती येथील उद्यानाच्या कार्यालयाजवळ असणाऱ्या अभ्यागत कक्ष्यात उद्यानातील प्राणी, पक्षी, कीटक, फुलपाखरे, पक्षी यांच्या प्रतिकृती व फोटो पाहवयास मिळतात. गतवर्षी कोरोनामुळे मार्चपासून पर्यटन बंद होते. लॉकडाउननंतर नोव्हेंबरपासून पर्यटन सुरू झाल्याने पर्यटकांचा ओघ चांदोलीकडे वाढू लागला आहे. 

दृष्टिक्षेप 

 • झोळंबीत पर्यटकांना पाहण्याची प्रमुख ठिकाणे : जनीचा आंबा, लपनगृह, झोळंबी सडा, विठ्ठलाई मंदिर, शेवताई मंदिर, मणदूर ते झोळंबी 21 किलोमीटर 
 •  उखळू ते उदगिरी सफरीतील ठिकाणे : तांबवे टॉवर, उदगिरी मंदिर, कोकण दर्शन (वारणावती-उदगिरी अंतर 20कि.मी.. 

उखळू-उदगिरी सहल 

 • प्रवेश शुल्क : 12 वर्षांआतील मुले 15, प्रौढ 30 रु. (प्रति व्यक्ती) 
 • सफारी वाहन 1200 रु. व वाहन प्रवेश शुल्क 100 रु. 
 • गाईड शुल्क 200 रुपये 
 • शैक्षणिक सहलीसाठी शुल्क : शालेय विद्याथी- 10, महाविद्यालयीन विद्यार्थी 20 रु. 
 • उद्यानात प्रवेश वेळ : स. 6 ते दु. 3 (गुरुवारी बंद) 
 • वारणावती येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात पर्यटकांना पास मिळण्याची सोय. 

उद्यानाकडे चार ठिकाणाहून जाता येते 

 •  सातारा-कराड-पचवड फाटा-शेडगेवाडी-चांदोली 
 • सांगली-पेठ नाका-शिराळा-कोकरूड-शेडगेवाडी-चांदोली 
 • कोल्हापूर-बांबवडे-कोकरूड-शेडगेवाडी-चांदोली 
 • रत्नागिरी- आंबा- मलकापूर- तुरुकवाडी फाटा- कोकरूड- शेडगेवाडी-चांदोली. 

चार महिन्यातील पर्यटक 

 • नोव्हेंबर - 1443 
 • डिसेंबर - 1724
 • जानेवारी - 1009
 • फेब्रुवारी - 885 
 • एकूण - 5061 

वर्षनिहाय पर्यटक संख्या 

 • 2014-15 : 2934 
 • 2015-16: 4142 
 • 2016-17 : 4406 
 • 2017-18 : 8113 
 • 2018-19 : 8641 
 • 2019-20 : कोरोनामुळे पर्यटन बंद 
 • 2020-21 : 5061 (फेब्रुवारी अखेर चार महिने) 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steps of tourists towards Chandoli ...