आधी गादीला पाडलेल्या वळकट्या सरळ करा ; श्रीनिवास पाटलांचा उदयनराजेंना टाेला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपर्डे हवेली येथे आयोजित जाहीर सभेत श्री. पाटील बोलत होते. 

कोपर्डे हवेली : निवडणूक काळात विरोधक दिशाभूल करण्यासाठी फतवा काढतील, त्यापासून सावध राहा. बाळासाहेबांना घड्याळ द्या. पृथ्वीराज चव्हाणांना हात द्या आणि मला साथ द्या. आम्ही शिवाजी महाराजांच्या गादीला नमन करतो, मान ठेवतो. परंतु, तुम्ही गादीला पाडलेल्या वळकट्या आधी सरळ करा, अशी जोरदार टीका लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता केली.
 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपर्डे हवेली येथे आयोजित जाहीर सभेत श्री. पाटील बोलत होते. 
या वेळी मानसिंगराव जगदाळे, अजितराव पाटील, सुहास बोराटे, संतोष वेताळ, संजीव देशपांडे, संजय जगदाळे, शंकरराव चव्हाण, बळवंतराव चव्हाण, मारुती बुधे, रामचंद्र चव्हाण, राजेंद्र चव्हाण, गोविंदराव थोरात, लालासाहेब चव्हाण, नेताजी चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, दयानंद पवार, शुभम चव्हाण, अमोल पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, ""काळा पैसा बाहेर काढणार, 15 लाख खात्यात जमा करणार, जीएसटी आदी प्रश्न हाताळण्यात सरकार अपयशी ठरले. "जीएसटी' मुळे उद्योगधंदे बुडाले. व्यापाऱ्यांचा व्यवसाय कोलमडून पडला. हे दडपशाहीचे सरकार असून, युतीच्या सरकारमुळे जनतेच नुकसान झाले आहे. काही लोक माझ्यावर टीका करतात, त्यांनी जनतेसाठी काय केले, ते आधी सांगावे. मला चिंता करायची गरज नाही. 21 तारखेला जनता काय करणार, याची चिंता तुम्ही करा.

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला मिळालेली 58 हजार मते कॉंग्रेसच्या विचारांची होती, ती आता आमच्याबरोबर आहेत. आता ती तुमची नाहीत. संस्थांचा वापर मी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करतो. राज्यात परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी युवकांना "मेगाभरती'ची आश्वासने दिली आणि नंतर पक्षातच "मेगाभरती' करून घेतली. हे फसवे सरकार आहे.'
 
पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. माधव चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. महादेव चव्हाण यांनी आभार मानले. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Straighten the bend that throws the throne first Srinivas Patil critices Udayanraje