Video महाबळेश्वर : लालचुटुक स्ट्रॉबेरी महागणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

महाबळेश्वर येथील बहुतांश भागांत स्ट्रॉबेरीचे क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामुळे यंदा बाजारपेठेत स्ट्रॉबेरीची टंचाई भासणार असे चिन्ह निर्माण झाले आहे. 

काशीळ (जि. सातारा) : स्ट्रॉबेरी हंगाम सुरवातीपासून संकटाच्या गर्तेत सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर परिसरात ढगाळ हवामान झाल्याने स्ट्रॉबेरीची फळे कुजू लागल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विविध संकटामुळे उत्पादन घटत असल्याने घेतलेले कर्जही भरता येणार नसल्याचे शेतकरी सांगत आहे.
 
महाबळेश्वर तालुक्‍यात स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक असून, या तालुक्‍यात अडीच हजार एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे पाचशे एकर क्षेत्रावर घट झाली आहे. या हंगामाच्या सुरवातीपासून संकटे सुरू झाली आहेत. अतिपावसाचा सुरवातीस रोपांना फटका बसला. रोपात पाणी साचल्याने रोपे कुजली गेली. याचा साहजिकच क्षेत्रावर झाला. 
स्ट्रॉबेरीची लागवड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणची स्ट्रॉबेरी पाण्याखाली गेली होती.

हेही वाचा -  महाबळेश्वर : लाॅडविक पाॅईंटवरील ताे मृतदेह पुण्यातील व्यक्तीचा
 
या अतिपाण्यामुळे स्ट्रॉबेरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. सततच्या पावसामुळे शेतात पाणी निघत नव्हते. एकूण क्षैत्रापैकी एक हजार एकर क्षेत्रावरील स्ट्रॉबेरी मर रोगाने गेल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. याचा उत्पादनावर परिणाम होणार असून, सुमारे 25 टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाबळेश्वर तालुक्‍याच्या पूर्व भाग, तसेच जावळी तालुक्‍यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यानंतर वन्य प्राण्यांकडूनही नुकसान झाले.

परतीच्या पावसामुळे लागवड लांबल्याने दिवाळीच्या तोंडावर मिळणाऱ्या चांगल्या दरापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले आहे. त्यात भर पडून आता ढगाळ हवामान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी वाचविण्यासाठी फवारण्या केल्या जात आहे. यामुळे भांडवली खर्चातही वाढ झाली आहे. 

नक्की वाचा - महाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये
 
मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा सततच्या ढगाळ वातावरण होण्यास सुरवात झाली आहे. या ढगाळ वातावरणामुळे फळे कुजू लागली आहे. अर्धवट वाढलेली फळेही कुजू लागल्यामुळे पुढील बहरात स्ट्रॉबेरी बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहे. यामुळे चांगल्या दरापासून शेतकरी वंचित राहणार आहे. ऐन बहरात स्ट्रॉबेरी कुजू लागल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. 

कर्जमाफीचा नाही लाभ 

महाबळेश्वर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक झाले आहे. एकरी या पिकांसाठी तीन ते साडेतीन लाख रुपये पीककर्ज मिळते. भांडवलासाठी बहुतांशी शेतकऱ्यांकडून कर्ज घेतले जाते. राज्य सरकारने थकीत दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. यामुळे बहुतांशी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. 

 
एकामागून एक संकटे येत असल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या हवामान बदलामुळे फळे कुजू लागली आहे. विविध संकटामुळे भांडवली खर्चही निघणार नाही. 
- गणपत पार्टे, प्रगतिशील शेतकरी, भिलार.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strawberry Fields Have Been Damaged In Mahabaleshwar