
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या घटत्या संख्येने दिलासा मिळाला असताना आता कोरोनामुक्त रुग्ण अनेक मानसिक आव्हानांना सामोरे जात आहेत. या रुग्णाच्या मनात ताण व धास्ती कायम असल्याचे दिसते.
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या घटत्या संख्येने दिलासा मिळाला असताना आता कोरोनामुक्त रुग्ण अनेक मानसिक आव्हानांना सामोरे जात आहेत. या रुग्णाच्या मनात ताण व धास्ती कायम असल्याचे दिसते. शुश्रुषाने सर्वेक्षणात कोरोनामुक्तांपैकी 65.5 टक्के लोकांत उदासिनता-नैराश्य दिसून आलेय. जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईनवर 5229 व्यक्तींनी संपर्क साधला आहे. 2921 रुग्णामध्ये तीव्र स्वरूपाची मानसीक आजाराची लक्षणे दिसून आली. त्यांचे मानसतज्ज्ञांद्वारे समुपदेशन सुरु आहे.
आरोग्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाने शुश्रुषाच्या माध्यमातून कोरोनामुक्तांसाठी हेल्पलाईन सेवा सुरु केली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी कोरोना पश्चात उपचारांचा भाग म्हणून संस्थेच्यावतीने माहिती संकलन व सुमपदेशनासाठी पुढाकार घेत जिल्हाभरात मोहिम राबवली.
कोरोन पश्चात आव्हानांत अशा रुग्णांत मानसिक ताणतणावाचे चित्र आहे. ताण तणाव, भीती, नैराश्य, भविष्याविषयी काळजी अशा लक्षणांचे प्रमाण वाढले आहे. टाळेबंदीतील आर्थिक अडचणींमुळे अनेकांना आत्महत्येच्या विचारांनी ग्रासल्याचे दिसून आले आहे.
हेल्पलाईनचे समन्वयक अक्षय साळुंखे म्हणाले,""सध्या 70 ते 80 कोविड रुग्णांशी रोज हेल्पलाईनद्वारे नियमित मानसीक आरोग्य विषयक संवाद साधला जातो. त्यांच्याकडून गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन माहिती भरुन घेतली जाते. कोरोनामुक्ती नंतर आलेला शरारिक व मानसीक थकवा, आर्थिक नुकसानीमुळे आलेला ताण याशिवाय भीती पोटी वाईट स्वप्न पडणे, विचार चक्र, एकटेपणा, अस्वस्थता, सतत आजारी असल्याची भावना, सहन न होणे, नाते संबंधातील कटुता, मनोकायिक त्रास वाढल्याचे मानसतज्ज्ञांच्या निदर्शनास आलेय. मानसीक स्वास्थ्य ढासळल्याचे चित्र दिसून येते.''
""आपत्तीनंतर वास्तवाला सामोरे जाता न आल्याने अनेक व्यक्ती मानसीक आजारांना बळी पडतात, अंधश्रध्दा फोफावतात. अशा काळात शास्त्रीय सुमपदेशानाची गरज असते. हेल्पलाइनच्या माध्यमातून आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना मानसीक आधार देता आला. मात्र अशा आधाराची शेकडो कुटुंबांना गरज आहे. हे आव्हान खूप मोठे आहे.''
- कालिदास पाटील, अध्यक्ष, शुश्रुषा संस्था
हेल्पलाईनवर संपर्क साधलेल्यांमधील मानसिक समस्यांचे प्रमाण
उदास-निराश वाटणे-65.5 टक्के
चिडचिडेपणा- 57.5 टक्के
आनंद हरवणे -55 टक्के
रागाची भावना- 54.7 टक्के
चिंता व काळजी वाटणे- 50टक्के
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली