वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यासाठी प्रसंगी संघर्ष

Vikreta.JPG
Vikreta.JPG

सांगली: वृत्तपत्र विक्रेता हा वंचित आणि दुर्बल घटक असून तो प्रामाणिकपणे राष्ट्रीय काम करत आहे. त्यांच्या मागण्या समन्वयाने सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. समन्वयाने त्या मान्य झाल्या नाहीतर संघर्ष करून पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा संघटनेचे मार्गदर्शक आमदार संजय केळकर यांनी येथे दिला. 


शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे आयोजित महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या "राज्य अधिवेशन 2020' मध्ये ते बोलत होते. माजी मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रम सावंत, महापौर संगीता खोत, श्रीमती जयश्री पाटील, राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र पवार, सरचिटणीस बालाजी पवार, कार्याध्यक्ष सुनिल पाटणकर, राज्य उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, सल्लागार शिवगोंड खोत, संघटना प्रतिनिधी मारूती नवलाई, सांगली जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक शेखर इनामदार आदींची प्रमुख उपस्थिती होती. 


आमदार केळकर म्हणाले, ""समाजात तळागाळात जाऊन काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन संघटना मोठी केली आहे. देशभरात अडीच कोटी विक्रेते कार्यरत आहेत. वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या मागण्यासाठी मागील सरकारच्या काळात प्रयत्न केले. आता महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. समन्वयाने मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून प्रसंगी संघर्ष करून त्या मान्य केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. विक्रेत्याचे काम हे राष्ट्रीय काम आहे. चौथ्या स्तंभाला आधार देण्याचे काम तो करतो. त्यामुळे त्यांना ताकद दिली पाहिजे. ठाणे शहरात आम्ही स्मार्ट स्टॉलची संकल्पना अंमलात आणली. विक्रेत्यांना विविध कामांच्या नेटवर्कमध्ये आणले तर त्यांची आर्थिक ताकद वाढेल. त्यांच्यासाठी पर्यायी उत्पनाची साधने असली तरी हक्काच्या मागण्यासाठी त्यांना केंद्रबिंदू मानून काम केले जाईल.'' 


आमदार खाडे म्हणाले,""विक्रेत्यांच्या अनेक अडचणी असून त्या सोडवण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी पाठपुरावा केला त्यांचे निश्‍चित समाधान होईल. विक्रेते कोणाला त्रास न देता प्रामाणिकपणे वितरणाचे काम करतात. पत्रकारितेचा तो पाया असून त्यावरच वृत्तपत्रे सुरू आहेत. विक्रेते गप्प राहिले तर सर्व समाजच अधू होईल. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन मागण्या सोडवूया.'' 
आमदार गाडगीळ म्हणाले, ""विक्रेत्यांचे मंडळ स्थापन करण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी एकत्रित येऊन भरीव काम करणे आवश्‍यक आहे. त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.'' 
जयश्री पाटील म्हणाल्या, ""मदनभाऊ पाटील यांनी देशातील पहिले विक्रेता भवन सांगलीत उभारले. त्यामुळे विक्रेत्यांची सोय झाली. विक्रेत्यांच्या अनेक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्या पूर्ण कराव्यात यासाठी निश्‍चितच पाठिंबा राहील.'' 


सरचिटणीस पवार म्हणाले, ""विक्रेत्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना सामाजिक सुरक्षश मिळवून दिली पाहिजे. कल्याणकारी मंडळासाठी गेली काही वर्षे पाठपुरावा सुरू आहे. आश्‍वासने खूप मिळाली आहेत. कामगार सुरक्षा मंडळामध्ये 122 घटकांचा समावेश आहे. त्यामुळे विक्रेत्यांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करून लाभ मिळाला पाहिजे. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल.'' 
कार्याध्यक्ष पाटणकर म्हणाले, ""शासनाच्या योजना आणि उपक्रम जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या विक्रेत्यांचे प्रश्‍न शासनस्तरावर पोहोचले पाहिजेत. त्यांच्या छोट्या-मोठ्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर आंदोलन करावे लागेल.'' 
सांगली जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वागत केले. राज्य उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. संघटक सचिन चोपडे यांनी आभार मानले. 
राज्य संघटनेचे रघुनाथ कांबळे, गोरख भिलारे, अण्णा गुंडे, राजेंद्र माळी, विकास पवार, गणेश गांधी, महिला आघाडी प्रमुख चंद्रीका राणे आदींसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी, तसेच राज्याबाहेरूनही संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 
 

वृत्तपत्र दिंडी..नेटके संयोजन- 
राज्य अधिवेशनास 26 जानेवारीला सुरवात झाली. पहिल्या दिवशी केंद्रीय समिती व कार्य समिती बैठक झाली. सर्वसाधारण सभा झाली. मुक्त चिंतन आणि मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. आज मुख्य दिवशी सकाळी कारखाना आवारातील छत्रपती शिवाजी पुतळा ते शांतिनिकेतन परिसरात वृत्तपत्र दिंडी काढण्यात आली. ध्वजवंदन झाले. उद्‌घाटनानंतर दुपारच्या सत्रात परिसंवाद होऊन सायंकाळी सांगता झाली. सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेने अधिवेशनासाठी नेटके संयोजन केले होते. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com