लॉकडाउनच्या फेऱ्यात अडकली एसटीची चाके 

घनश्‍याम नवाथे
Monday, 27 July 2020

लॉकडाउननंतर निम्म्या प्रवासी क्षमतेने धावू लागलेली एसटी पुन्हा "लॉकडाउन' च्या फेऱ्यात अडकली. जिल्ह्यातील चित्र पाहिले तर दररोज 75 ते 80 लाखाचा फटका विभागाला बसतो आहे.

सांगली : लॉकडाउननंतर निम्म्या प्रवासी क्षमतेने धावू लागलेली एसटी पुन्हा "लॉकडाउन' च्या फेऱ्यात अडकली. जिल्ह्यातील चित्र पाहिले तर दररोज 75 ते 80 लाखाचा फटका विभागाला बसतो आहे.

सध्या केवळ एसटीची माल वाहतूक सुरू आहे. एसटीच्या तोट्याचा फेरा काही कमी होत नसून तशातच डिझेल दरवाढीचा सामना देखील करावा लागत आहे. त्याशिवाय प्रशासकीय धोरणाबाबत संतापजनक प्रतिक्रिया संघटनांकडून उमटत आहेत. मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाउन' सुरू केल्यानंतर एसटीच्या फेऱ्या बंद झाल्या. जिल्ह्यातील जवळपास 850 गाड्या जागेवरच थांबल्या.

अडीच ते तीन महिन्यानंतर एसटी पुन्हा धावू लागली. परंतू कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आदेश असल्यामुळे एका सीटवर एकच प्रवासी बसवले जातात. निम्म्या प्रवासी क्षमतेने एसटी धावू लागली असतानाच उत्पन्न वाढीसाठी एसटी ने मालवाहतूक देखील सुरू केली. जिल्ह्यातील दहा आगारात एसटीच्या 19 गाड्या माल वाहतुकीसाठी कार्यरत आहेत. या गाड्यामधील आसने काढून त्याचा मालट्रक म्हणून वापर केला जात आहे. माल वाहतुकीसाठी एसटीचे कर्मचारी ट्रान्स्पोर्ट व्यवसायिकांच्या संपर्कात आहेत. प्रवासी वाढवा अभियानानंतर आता अनेक कर्मचारी "माल देता का माल' म्हणून धडपडत आहेत.

एसटी तोट्यातून बाहेर पडावी यासाठी कर्मचारी प्रयत्न करत आहेत. 
एसटीने वेतनात कपात केल्यामुळे अगोदरच वेतन कमी असलेले कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तसेच रजा आणि बदल्यांवरून वातावरण तापले आहे. सध्या निम्मे प्रवासी भरून तसेच माल वाहतुकीच्या माध्यमातून कसेबसे उत्पन्न मिळवले जात होते. परंतू जिल्ह्यातील लॉकडाउनमुळे पुन्हा एसटीची प्रवासी वाहतूक थांबली आहे. एसटीला लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात दररोज 75 ते 80 लाखाचे उत्पन्न मिळत होते. ते थांबले आहे. सध्या निम्म्या प्रवासी क्षमतेने हे उत्पन्न कमी झाले होते. परंतू लॉकडाउनमुळे पुन्हा चाक थांबले आहे. तशातच डिझेल दरवाढीचा फटका देखील सहन करावा लागत आहे. लॉकडाउन संपण्याची तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू होण्याची प्रतिक्षा "एसटी' ला लागली आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST's wheels stuck in a round of lockdown