साताऱ्यातील चारशे विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

अकरावीच्या जादा जागा देण्याचा प्रश्‍नच नाही
जिल्ह्यातील काही महाविद्यालयांकडून माध्यमिक शिक्षण विभागाकडे अकरावी प्रवेशासाठी जादा जागांची मागणी केली आहे. परंतु, अद्याप बहुतांश महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक आहेत. तसेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थीसंख्या व अकरावी प्रवेशाची संख्या लक्षात घेतली तर एकाही महाविद्यालयास जादा जागा वाढवून देण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.

सातारा - विज्ञान आणि वाणिज्य शाखेत अकरावीच्या वर्गात प्रवेश मिळावा, यासाठी सातारा शहरातील नामांकित महाविद्यालयांत अद्यापही सुमारे ३९९ वर विद्यार्थी व पालक अपेक्षा ठेवून आहेत. मात्र, यंदा दहावी उत्तीर्ण विद्यार्थीसंख्या व अकरावीची प्रवेशाची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील एकाही महाविद्यालयास जादा जागा वाढवून देणार नसल्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे. 

दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने २२ जूनला प्रक्रिया सुरू केली. अकरावी प्रवेशासाठी यंदा एसईबीसी (मराठा समाज आरक्षण), ईडब्ल्यूएस (आर्थिक दुर्बल घटक) या नव्यानेच निर्माण झालेल्या आरक्षणाचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली. प्रतिवर्षाप्रमाणे गुणवत्ता यादी जाहीर झाली. दहावीच्या नवीन अभ्यासक्रमामुळे कमी प्रमाणात लागलेल्या निकालाच्या टक्केवारीचा विज्ञान व वाणिज्य शाखेच्या गुणवत्ता यादीवर परिणाम झाला.

जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होऊन मंगळवारी (ता.१६) प्रत्यक्ष अकरावीच्या वर्गांना प्रारंभ झाला आहे. शहरातील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स तसेच महाराजा सयाजीराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे अनुदानित व विनाअनुदानित तुकड्यांमधील प्रवेश संपूर्णतः पूर्ण झाले आहेत. तरीही विज्ञान शाखेसाठी सायन्स कॉलेज तसेच महाराजा सयाजीराव हायस्कूल येथे तसेच वाणिज्य शाखेसाठी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय येथे प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थी व पालक महाविद्यालयांत गर्दी करीत आहेत. या तिन्ही महाविद्यालयांतील कार्यालयांत दररोज साधारणतः २० ते २५ पालक सातत्याने प्रवेशाची विचारणा करताना दिसतात. सद्य:स्थितीत प्रवेश शिल्लक नसल्याचे महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांकडून त्यांना सांगितले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Admission Waiting Education