सोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा 

परशुराम कोकणे
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे. 

सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे. 

विजयपूर येथील बीएलडीईए आर्किटेक्‍चर कॉलेजच्या प्राध्यापिका गंगा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शुभमने प्रोजेक्‍ट म्हणून हा आराखडा तयार केला आहे. शुभम हा सहायक पोलिस निरीक्षक विजय बादोले यांचा मुलगा आहे. तलावासोबतच शेजारील स्मृती उद्यान परिसराचाही यात समावेश करण्यात आला आहे. तलाव आणि स्मृती वनउद्यान सुशोभीकरण केल्यास सोलापूरच्या सौंदर्यात व पर्यटनात कशी भर पडेल, हे मांडण्यात आले आहे. सुशोभीकरण करताना तलाव परिसरातील तापमानाचे संतुलन राखणे आवश्‍यक आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड सुचविण्यात आली आहे. तलावाच्या बाजूचा परिसर स्वच्छ केल्यास येथील इको सिस्टिमचे संवर्धन करता येईल. नागरिकांकरिता व्यायाम व योग करण्यासाठी व्यवस्था करता येईल. सुशोभीकरणानंतर स्थानिक नागरिकांना रोजगार मिळणार आहे. या ठिकाणी सोलापूरची चादर, टॉवेल आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करता येईल. 

काय आहे शुभमच्या आराखड्यात? 
- सोलार पॅनेलचा वापर करून अर्धगोलाकार आकर्षक प्रवेशद्वार उभारणे 
- लॅंड स्केपिंग आणि गार्डन डेव्हलपमेंट 
- चिल्ड्रन पार्क 
- म्युझिकल फाउंटेन 
- उतारावर रंगीबेरंगी फुलझाडांची लागवड 
- पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी जागोजागी कारंजे 
- तलावाच्या सभोवताली सोलरवर एलईडी लाइट बसविणे 
- रेम्बो व्हिव पॉइंट बनविणे 
- पाण्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी तलावाच्या बाजूने मॉर्निंग ग्लोरी कारंजे बसविणे 
- गणेश मूर्ती विसर्जन घाट वेगळ्या ठिकाणी हलविणे 
- सांडपाण्याचे नियोजन करून योग्य व्यवस्थापन करणे 
- धोबीघाटाला पर्यायी जागा उपलब्ध करणे 
- वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारणे 
- बोटिंगची व्यवस्था करणे 
- तलावाभोवती संरक्षक भिंत उभारणे व वॉकिंग ट्रॅक करणे 
- बसण्यासाठी छत असलेले बाकडे बसविणे 
- बाहेरील बाजूस पार्किंगची व्यवस्था करणे 
- परिसरात छोटे फूड स्टॉल उभारणे 

जलप्रदूषणामुळे संभाजी तलाव जलपर्णीच्या विळख्यात अडकला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकही तलावाकडे फिरकत नाहीत. तलावाचा विकास केला तर सोलापूरच्या पर्यटनास चालना मिळेल. महापालिकेच्या महसुलात वाढ होईल. स्थानिकांना रोजगारही मिळेल. मी प्रोजेक्‍ट म्हणून मांडलेल्या आराखड्याबाबत शासनाने आणि सोलापूर महापालिकेने सकारात्मक विचार करावा. 
- शुभम बादोले, विद्यार्थी

Web Title: a student put a renovation plan of sambhaji talav at solapur