अग्निशमन यंत्राविना स्कूलबस, विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्‍यात

schoolbus
schoolbus

सोलापूर : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अग्निविमोशक यंत्र असणे बंधनकारक आहे. संस्थेने प्रमाणित केलेली पाच किलोग्रॅम वजनाची एबीसी प्रकारातील दोन अग्निशमन यंत्रे असणे बंधनकारक असून एक चालक कक्षात तर दुसरे संकटसमयी बाहेर पडावयाच्या मार्गाजवळ असणे आवश्‍यक आहे. मात्र, शहरातील 833 पैकी सुमारे 478 स्कूल बसमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित दिसत नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या गंभीर बाबीकडे पाहण्यास आरटीओसह शहर वाहतूक पोलिसांना अद्याप वेळ मिळालेला नाही. 

स्कूल बसच्या खिडक्‍यांत तीन आडव्या दांड्या असाव्यात, दोन दांड्यांमधील अंतर पाच सेंमीपेक्षा अधिक असू नये, मुलांच्या स्कूल बॅग्ज, पाणी बॉटल्स, जेवणाचे डबे ठेवण्याकरिता बसमध्ये स्वतंत्र व्यवस्था असावी, बसची सर्व आसने सुटसुटीत असावीत, प्रथमोपचार संचात आवश्‍यक साहित्य व औषधे उपलब्ध असावीत यासह अन्य नियमावलीची अंमलबजावणी करणे स्कूल बसचालकांसाठी बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश स्कूल बसमध्ये अशी यंत्रणा नसतानाही आरटीओ अथवा वाहतूक पोलिस त्याकडे काणाडोळा करीत असल्याचे चित्र पाहण्यात येते. एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतरच या यंत्रणेला जाग येईल का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. 

शहराची सद्यस्थिती 
स्कूल बस 
833 
विद्यार्थी क्षमता 
15,920 
प्रत्यक्ष विद्यार्थी वाहतूक 
20,000 
अग्निशमन यंत्र नसलेल्या स्कूल बस 
सुमारे 478 

स्कूलबसची क्षमता, विद्यार्थ्यांची सोय, अग्निशमन यंत्र, प्रथमोपचार साहित्य व औषधे यांची तपासणी केली जात आहे. ज्या स्कूल बसमध्ये अशी यंत्रणा नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू असून आतापर्यंत 100हून अधिक स्कूल बसवर कारवाई केली आहे. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर 

विद्यार्थ्यांच्या जीवाचा खेळ कधी थांबणार 
स्कूल बसमधील कर्मचारी, स्कूल बसची रचना, विद्यार्थ्यांसाठीची व्यवस्था, शुल्क यासह अन्य बाबींसाठी राज्य सरकारने स्वतंत्र नियमावली तयार केली. जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित होईल हा उद्देश होता. मात्र, स्कूल बसचालकांना ही सर्व व्यवस्था करणे परवडत नसल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे शासकीय यंत्रणाही त्याकडे काणाडोळा करू लागल्याचे चित्र पाहण्यात येत आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक खासगी रिक्षांसह स्कूल बसमधून राजरोस सुरूच आहे. महिन्यातून एकादा केव्हातरी कारवाईचा फार्स केला जातो. परंतु, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे ही यंत्रणा कधी गांभीर्याने पाहणार, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com