स्मशानभूमीत अभ्यास करून मिळवले 80 टक्के गुण 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 27 जून 2018

सोलापूर : जन्मच मुळात स्मशानभूमीतला, त्यामुळे स्मशानाची भीती नाही... अमावस्या असो वा पौर्णिमा... काही फरक नाही... मध्यरात्री बारा-साडेबारापर्यंत स्मशानभूमीतल्या हिरवळीवर अभ्यास...सोबतीला सवंगडीही...अशा स्थितीत राकेश राहूल बागले या विद्यार्थ्याने 79.20 टक्के गुण घेत उल्लेखनीय यश मिळवलेच, शिवाय शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. 

रयत शिक्षण संस्थेच्या रावजी सखाराम या शाळेतून राकेशने दहावीची परिक्षा दिली. वडील महापालिकेत मजूर म्हणून कार्यरत, आई गृहिणी. आजोबा कारंबा स्मशानभूमीचे राखणदार होते. त्यामुळे स्मशानभूमीच्या परिसरातच राकेशचा जन्म झालेला. स्शमानभूमीत दिवसा जाण्यास लोक घाबरतात. पण राकेशने रात्री-मध्यरात्रीपर्यंत याच स्मशानभूमीत अभ्यास केला. मित्र स्मशानभूमीत अभ्यास करतोय म्हटल्यावर वर्गातील सहकारीही आले आणि त्यांनी जोमाने अभ्यास केला. या स्मशानभूमीत अभ्यास केलेले सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. 

राकेशने आता शास्त्र शाखेत प्रवेश घेतला आहे. घरची गरीबी असली तरी मुलाची सर्व ईच्छा पूर्ण करण्याचा संकल्प त्याचे वडील राहूल बागले यांनी केला आहे. प्रतिकूल स्थितीत भावाने मिळवलेले यश पाहून राकेशच्या तिन्ही बहिणीही आनंदून गेल्या आहेत. आपणही दहावीच्या परिक्षेत असेच यश मिळवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. 

वडिलांनी दिले...चोराने नेले...नगसेवकाने तारले 
राकेश दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांनी त्यास रेंजर सायकल घेऊन दिली. जातीचा दाखला काढण्यासाठी राकेश जिल्हाधिकारी कार्यालयात गेला. त्या ठिकाणी सायकल चोरीला गेली. नवीन सायकल चोरीला गेल्याने राकेश घाबरला, पण वडिलांनी त्याची समजूत काढली. पण एकदम साडेचार हजार रुपयांची सायकल घेणे लगेच शक्‍य नाही, असेही सांगितले. ही घटना बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना समजली. त्यांनी राकेशला कार्यालयात बोलावून घेतले आणि हरविलेल्या सायकलप्रमाणेच नवीन सायकल घेऊन दिली. त्यावेळी राकेशने आनंदाश्रु ढाळून आनंद व्यक्त केला. 

Web Title: studied inn graveyard and got 80 percent