परिस्थितीशी सामना करत "तो' यशस्वी

Succesful of Vitthal harale in Uplai budruk
Succesful of Vitthal harale in Uplai budruk

उपळाई बुद्रुक (सोलापूर) : मनात इच्छा असेल तर कठीणातल्या कठीण परिस्थितीवर मात करीत यशाचा डोंगर मोठ्या धाडसाने आपण चढू शकतो. हे आपण फक्त कोणत्याही फलकावर लिहिलेल्या सुविचार स्वरूपात पाहिले असेल किंवा एखाद्या विचारवंतांच्या मार्गदर्शनात ऐकले असेल, परंतु याची प्रचिती माढा तालुक्‍यातील उपळाई खुर्द येथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत राहून वेळोवेळी आर्थिक परिस्थितीशी सामना करीत येथील विठ्ठल गणपत हराळे या युवकाने राज्यसेवेच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत एनटीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम येत घवघवीत यश संपादन केले आहे. 
घरात अठराविश्‍वे दारिद्य्र... त्यात दुष्काळी परिस्थिती, रोजगार उपलब्ध नसल्याने कुटुंब प्रचंड आर्थिक संकटातून जात होते. वडील मिळेल तिथे सालगड्याचे काम करत होते. मोठ्या चार बहिणी व दोन मुलांना शिक्षण देत असताना कुटुंब खासगी सावकारकीमध्ये अडकल्याने दोन एकर जमीन विकावी लागली होती. पण मुलांच्या शिक्षणास कोणताही अडथळा वडिलांनी येऊ दिला नाही. कारण आपल्या मुलांनी देखील अधिकारी व्हावे, अशी वडिलांची प्रबळ इच्छा. अशातच विठ्ठल हराळे दहावीत बोर्डाच्या परीक्षेत शाळेत प्रथम आल्याने वडिलांच्या इच्छा अजून वाढल्या. परंतु घरच्या परिस्थितीमुळे ज्या शाळेत विठ्ठल दहावीत पहिला आला त्या शाळेत उन्हाळी सुटीत गवंड्यांच्या हाताखाली विटा देण्याचे काम केले. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, देवापूर येथे कोणताही क्‍लास न लावता बारावीमध्ये 84 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले. 

हेही वाचा- सोलापुरातील बंडखोरांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे ऍड. मराठे
यशाचा एक-एक डोंगर सर करत असताना काही दिवसांतच त्यांच्या या वाटचालीत अनेक अडथळे आले. अचानक विहिरीत काम करत असताना वडिलांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्‍यावर कायम असलेला वडिलांचा आशीर्वादाचा हात निर्जीव झाला. या घटनेमुळे ते थोडी खचले...पण या प्रसंगाने आपले ध्येय ते विसरले नाहीत. वडिलांचे छत्र हरविल्याने घरचा आर्थिक कारभार बिघडला. घर चालविण्यासाठी त्यांची आई अनेक कामे करून पै पै जमा करून आपला फाटका संसार चालवू लागली. विठ्ठल यांची शिक्षणासाठीची धडपड बघून मोठा भाऊ बिरुदेव यांनी पदवीचे शिक्षण अर्धवट सोडून भावाच्या शिक्षणासाठी शेतात काबाडकष्ट करून शिक्षणासाठी पैसे पुरवले. हे सर्व पाहून विठ्ठल यांचे ध्येय आणखी बळकट होऊ लागले. अशा वातावरणातही आई सतत तू शिक, मोठा हो, गरिबीत राहू नकोस, अशी प्रेरणा देत होती. आई व मोठ्या भावाने काबाडकष्ट करीत कराड येथे औषधनिर्माण शास्त्र विद्यालयात पुढील शिक्षणासाठी पाठविले. जेथे इच्छाशक्ती असते तेथे संधी आपोआप मिळत असते. त्यासाठी मग कितीही मोठे अडथळे वा मर्यादा आल्या तरी यश मिळते, हा विचार विठ्ठल यांच्या मनात ठसून भरला होता. म्हणूनच त्यांनी शिक्षणाची वाटचाल अगदी वेगाने सुरू केली. 
उच्च पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या नामांकित कंपनीत नोकरीच्या संधी होत्या. परंतु, वडिलांनी बघितलेले स्वप्न व आई व भावाच्या कष्टाचे चीज व्हावे म्हणून प्रशासकीय अधिकारी होण्याचा निर्धार केला. पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले नाही. त्यामुळे विठ्ठल हे निराश झाले पण हार मान्य करायची नाही अशी मनाशी खूणगाठ बांधली होती. अपार परिश्रम करत जिद्द, ध्येय यांच्या बळावर 2019 मध्ये विठ्ठल यांनी अखेरीस राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेले. विक्रीकर निरीक्षक परीक्षेत एनटीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एकीकडे शुल्लक कारणावरून सख्खे भाऊ पक्के वैरी बनलेले बघायला मिळत असताना मात्र उपळाईतील बिरुदेव हराळे यांनी लहान भावासाठी शिक्षणाचा केलेला त्याग व भावाने सार्थ केलेला विश्‍वास सर्वांसाठी प्रेरणादायी असाच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com