अन् तारळी नदीतून 'तिला' पकडले 

magar.jpg
magar.jpg

तारळे : आंबळे (ता. पाटण) येथील तारळी नदी पात्रातील एका डबक्यात स्थानिक मासेमारी करणाऱ्या युवकांना मगर दिसली. त्यांनी गावकऱ्यांना कल्पना दिली. वनविभागाला माहिती देताच वनविभागाने अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर मगर पकडली. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तारळेतील राकेश वाघे, महेश पवार, प्रकाश पवार, अंकुश निकम हे कातकरी नऊच्या सुमारास युवक खेकडे पकडण्यासाठी आंबळे पुलनाजीक नदीपात्रात उतरले होते. तेथे वाळवंटात मगर पहुडलेली दिसली. मगर पाहून चौघेही घाबरले. त्यांच्या चाहुलीने मगर शेजारील डबक्यात गेली. चौघे बाहेर येऊन नदीकाठी राहणाऱ्या राजेश नवले यांच्या घरापाशी जाऊन त्यांना माहिती दिली. त्यांनी पोलिस पाटील वनविभागाला कळविले.

हळूहळू आंबळे गावसह आसपासच्या गावात माहिती पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जिवंत मगर पाहण्यासाठी स्थानिकांची झुंबड उडाली होती. रात्री दहापर्यंत सुमारे दोनशे तरुणांचा गराडा डबक्यातील मगरी भोवती पडला होता. त्यात हौशे नवशे हुल्लडबाज तरुणांची संख्याही भरपूर होती. मगर शांत निपचित पडून होती. पोलिसही घटनास्थळी पोहोचले मात्र बघ्यांची गर्दी हटत नव्हती.

अखेर उंब्रज वरून अधिकारी आल्यावर काहीसा जमाव शांत झाला. वनरक्षक रविंद्र कदम व सहाय्यक संपत टोळे तातडीने तेथे हजर झाले. त्यांनी स्थिती पाहून टीम येण्याची वाट पाहिली.
बाराच्या सुमारास पाटणवरून वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल हणमंत कुंभार, वनरक्षक अरविंद जाधव, जयवंत कंवर, सुरेश सुतार तर कराड वरून मान्यद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनक्षेत्रपाल डॉ साजने आदीजण आले. दोरीचा फास करून तो तोंडात अडकवून मगरीला पकडण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र मगरीने चार पाच वेळा हिसका देऊन पकडणारांना पाडले. मात्र फास पोटाभोवती अडकल्याने मगरीला पळता आले नाही. पुन्हा दुसरा फास करून तोंडात अडकविला. मग मगरीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंत मगर पूर्णपणे ताब्यात आली. वनविभागाच्या टीम बरोबर स्थानिक युवकांनीही मदत केली.  मगर पकडून अधिकऱ्यांनी तीस नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. सुमारे आठ फूट लांब व नव्वद किलो वजनाची ही मगर असल्याची महिती वनविभागाने दिली. वनविभागाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन ते ही रात्रीच्या वेळी राबवून मगर पकडल्याने ग्रामस्थांनी त्यांना धन्यवाद दिले.

घटनास्थळी बघ्यांची जत्रेसारखी गर्दी - घटनास्थळी बघ्यांची जत्रे सारखी गर्दी जमली होती. त्यांचा गलका व हुल्लडबाजीमुळे रेस्क्यू ऑपरेशनला अडथळे येत होते. मात्र त्या तरुणाईला त्याची कसलीच फिकीर नव्हती. अधिकाऱ्यांनीही त्याविषयी नाराजी व्यक्त केली. मध्यरात्रीही मगर पकडण्याचा थरार अनुभवण्यासाठी तो कॅमेराबद्ध करण्यासाठी अनेक जण धडपड करत होते.

परिसरात भीतीचे वातावरण- तारळे विभागात प्रथमच मगरीने दर्शन दिल्याने एकच खळबळ उडाली होती. धनगरवाडी व तारळे येथेही काहींना मगरीने दर्शन दिल्याची माहिती समोर येत आहे. ती मगर हीच होती का दुसरी या विषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. अजून मगर असण्याच्या शक्यतेच्या चर्चेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com